अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर,
मुंबई : सीबीएसई दहावी बोर्डाचा (CBSE Result) निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्र जाहीर झाले आहे. ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेला 25 मे पासून सुरूवात होणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होण्याआधी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया अर्जाचा भाग 1 भरणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालानंतर कॉलेज पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग दोन भरण्यास वेळ दिला जाणार आहे.
राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांना येत्या 25 मे पासून इयत्ता दहावीच्या निकालापर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे. विद्यार्थी येत्या 20 ते 24 मे या कालावधीत प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करू शकतात, असे राज्य माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे 2017-18 पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जातात. 2023-24 या वर्षातील प्रवेश सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच केले जाणार आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
कसे असेल वेळापत्रक?
20 मे ते 24 मे दरम्यान विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यासाठी चा सराव करण्यासाठी वेळ दिला जाणार.
25 मे सकाळी 11 वाजल्यापासून ते दहावी बोर्ड परीक्षाचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक ऑनलाईन पद्धतीने भरता येणार.
यामध्ये विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन करून अर्जाचा भाग एक भरून व्हेरिफाय करायचे आहे.
दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश अर्जाचा भाग दोन विद्यार्थ्यांना भरता येईल.
ज्यामध्ये विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचे पसंती क्रमांक देऊन इतर माहिती भरावी लागणार आहे.
दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात पहिली प्रवेश फेरी पूर्ण करून विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया केली जाईल.
त्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी आणि तिसरी त्यासोबतच विशेष फेरीचा नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येईल