अमेठी जिंकलो तसे बारामतीही जिंकू – राम शिंदे

दत्ता ठुबे
बारामती – आम्हाला वाटले अमेठीला जावे, तेथे आम्ही गेलो आणि जिंकलोही. आता बारामतीत जिंकायचे आहे. जर आम्ही अमेठी जिंकतो तर बारामतीही जिंकू. तेव्हा सुप्रिया सुळे यांना आता दुसरा “वायनाड’ पाहावा लागेल, असा टोला आमदार राम शिंदे यांनी लगावला.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी आमदार शिंदे यांच्यावर देण्यात आली आहे. दि. 22, 23, 24 सप्टेंबर रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याची आखणी ते करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे हे पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही 2014 आणि 2019 ची निवडणूक हरलो. आता आमचे लक्ष 2024 च्या निवडणुकीवर आहे.
2024 साठी आम्हाला उमेदवार ठरवायचा आहे. 2014 ते 2024 या काळात मोठा बदल झालेला आहे. मात्र, जर का आम्ही अमेठी जिंकू शकतो, तर मग बारामतीही आम्ही जिंकू. आम्हाला अमेठीत जावे लागले. आम्ही तेथे गेलो आणि जिंकलो. बारामतीत 2014 ची निवडणूक हरलो. 2019 ची निवडणूकही हरलो. मात्र, आता 2024 ची निवडणूक जिंकणारच. तेव्हा आता सुप्रिया सुळे यांना दुसरा वायनाड पहावा लागेल, अशी बोचरी टीका त्यांनी बारामतीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात केली. नोटीस आली असेल तर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. पण त्यांचा अभ्यास सुरू आहे. बहुतेक तीन प्रकरणांमध्ये त्यांना नोटीसा आलेल्या आहेत. सध्या ते अभ्यास करीत आहेत. अभ्यास करून ते ईडीला उत्तर देतील. ईडीला सहकार्य करायची भूमिका त्यांनी संजय राऊत यांच्यासारखी घेतली आहे.