अमृतसरहून कटरा येथे जाणारी बस दरीत कोसळली, 10 ठार

अमृतसर-जम्मू-काश्मीरमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. अमृतसरहून कटरा येथे जाणारी ही बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांचा आकडा अद्याप समजू शकला नसून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू जिल्ह्यातील झज्जर कोटली या भागात ही बस एका पुलावरून थेट दरीत कोसळली. हे ठिकाण जम्मूपासून सुमारे 35 किमी आणि कटरापासून सुमारे 15 किमी अंतरावर आहे. दरम्यान अपघातानंतरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. माता वैष्णोदेवीला जाणारे भाविक या बसमध्ये होते की नाही याची पुष्टी अद्याप झालेली नाही. मात्र, बसची स्थिती पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर स्थानिक लोकही घटनास्थळी मदतीसाठी पोहोचले आणि त्यांनी लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले.