पुस्तकांशी मैत्री करून वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज . – संतोष साबळे

सी.डी.ओ. मेरी शाळेत ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रम
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांची उपस्थिती
नाशिक : विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करून वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. ग्रंथ वाचनाने ज्ञान समृद्ध होते. शब्द संपत्ती वाढते. मन नेहमी प्रसन्न राहते. जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगली पुस्तके वाचणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत धड्याचे लेखक तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील अधिकारी संतोष साबळे यांनी केले.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सी.डी.ओ. मेरी हायस्कूल येथे मराठी विभाग व मराठी वांडमय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लेखक संतोष साबळे बोलत होते. इयत्ता पाचवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांचा जीवनपट व कर्तृत्वावर आधारित पाठ आहे. या निमित्ताने धावपटू कविता राऊत आणि लेखक संतोष साबळे यांनी विद्यार्थ्यांशी दुहेरी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कविता राऊत व संतोष साबळे यांनी उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. विद्यार्थ्यांनी कविता राऊत आणि संतोष साबळे यांचा गुलाब पुष्प व आकर्षक भेटकार्ड देऊन स्वागत केले.
यावेळी कविता राऊत म्हणाल्या की, प्रत्येकाने आपल्या जीवनात एक ध्येय निश्चित केले पाहिजे. आपल्या कामात सातत्य ठेवून ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अथक परिश्रम घेतले पाहिजे. खेळामुळे आपले आरोग्य उत्तम राहते. प्रत्येकाने दररोज आपल्या आवडीचे खेळ खेळले पाहिजे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक गंगाधर बदादे होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक चिमण सहारे व सुरेखा सोनवणे उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. गीत मंचाने स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वांडमय मंडळ प्रमुख व शिक्षक मंडळ सदस्य दिलीप अहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख विजया देशमुख यांनी केले, तर ज्येष्ठ शिक्षिका छाया गुंजाळ यांनी आभार मानले. याप्रसंगी भारती हिंडे, शिला गायधनी, नेहा गांगुर्डे, मनीषा मोरे, दीपमाला चौरे, यशश्री रत्नपारखी, कल्पना जोपळ, कांचन खेताडे, कुंदन गवळी तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.