सह्याद्री व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
अभिनव शिक्षण संस्था संचलित सह्याद्री व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल राजुर मध्ये 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक,कवी,कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी राजभाषा दिवस साजरा केला जातो.
या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्राची संस्कृती तसेच शिवचरित्रावर आधारित पोवाडे व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध शाहीर गणेश भिसे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी भाषा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडे व गाण्यांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. मराठी भाषा ही आपली मायबोली असो ती जपली पाहिजे तसेच या आधुनिक युगात ती भाषा टिकली गेली पाहिजे त्याच बरोबर मराठी जन्मभूमीत जे विद्वान करून गेले त्यांचे जीवन चरित्र त्यांनी शाहिरी गाण्यातून सादर करण्याचे काम यावेळी त्यांनी केले. शाहीर गणेश भिसे यांच्यासोबत किबोर्ड वादक गणेश बगाड, संबळ वादन योगेश जाधव, कोरस विशाल गणाचार्य आणि ओम थिटे, ढोलकी वादक दौलत घारे, पॅड वादक गटकळ यांनी या कार्यक्रमाला साथ दिली.
छत्रपती शिवाजी महाराज व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेनुसार गण गवळण सादर करण्यात आली. त्यानंतर शिवाजी महाराजांची पोवाडे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्य माता जिजाऊ व रमाबाई आंबेडकर यांच्या कार्याला गीतांमधून आदरांजली देण्यात आली. शाळेचे संगीत शिक्षक आशिष हंगेकर यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम पार पडला यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाड्यांचे सादरीकरण केले. तसेच मनीषा सोनवणे व शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका संगीता बारेकर यांनीही कार्यक्रमात गीतांचे सादरीकरण यावेळी केले.
दिप्ती लहामगे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यात त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील विविध महान ग्रंथ व कवी यांच्या बद्दल माहिती सांगितली. स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषा महत्त्वाची असून पण आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषा गरजेची असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमास नंदकिशोर क्षीरसागर, मुक्ता वाकचौरे, श्रद्धा पाटील, कल्पना सुकटे, दिनेश पथवे, नितीन देशमुख, किरण भांगरे, आदी शिक्षक व कर्मचारी वृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना साबळे यांनी मानले.