वीज कंत्राटी कामगारांना न्याय देऊ – प्रधान सचिव आभा शुक्ला

पुणे प्रतिनिधी
गुरुवार दिनांक 15 जून रोजी वीज कंपनीचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड बांद्रा मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीची बैठक प्रधान सचिव ऊर्जा श्रीमती आभार शुक्ला यांच्या समवेत झाली. या बैठकीला तिन्ही वीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.
3 जानेवारी 2023 रोजी वीज उद्योगात झालेल्या संपात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) हजारो कामगार सहभागी झाले होते. या कामगारांचे वीज उद्योगात मोठे योगदान असून त्यांच्या समस्यां सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना वीज कामगार संघाचे महामंत्री अरुण पिवळं यांनी ऊर्जा सचिव यांना केली असता लवकरच कंत्राटी कामगार संघाची स्वतंत्र बैठक आयोजित करून त्यांच्या समस्यां सोडवून त्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला यांनी दिले आहे.
पंजाब ओडीसा, राजस्थान ,आंध्रप्रदेश राज्यातील कंत्राटी कामगारांना नोकरीत सामावून घेणे , जॉब सिक्युरिटी, कंत्राटदार विरहित रोजगार, पगारवाढ तसेच कंत्राटदारांच्या माध्यमातून संगनमताने होत असलेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार इत्यादी विषयांवर चर्चा होऊन राज्यातील कंत्राटी कामगारांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ मागील अनेक वर्षं संघर्ष करत आहे. उपमुख्यमंत्री , ऊर्जामंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी देखील संघटनेला या बाबत आश्वासन दिले असून 2024 पूर्वी याची पूर्तता होण्यासाठी संघटना कटिबद्ध असून राज्यातील कामगारांनी एकजूट ठेवावी असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.