पारनेर महाविद्यालयाच्या 3 विद्यार्थिनींची आयआयटी मुंबई येथे समर स्कूलसाठी निवड !

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, रसायनशास्त्र विभागातील कु. वाळुंज निकिता, कु. कर्डिले वैष्णवी, कु.मगर दिपाली या प्रथम वर्ष पदवीत्तर वर्गातिल विद्यार्थिनींची आयआयटी मुंबई या ठिकाणी ऑर्गनिक केमिस्ट्रि समर स्कूलसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी दिली. ३ ते ८ जुलै दरम्यान आयआयटी मुंबई या ठिकाणी समर स्कूलचे आयोजन होणार असून या कार्यक्रमामध्ये भारतभरातील विविध ख्यातनाम वैज्ञानिकांचे व्याख्याने व जगभरामध्ये सुरू असलेल्या संशोधन कार्याविषयी माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थिना विविध संशोधन उपकरणांची हाताळणी करता येणार आहे असे प्राचार्य आहेर यांनी सांगितले.
आयआयटी मुंबई व पारनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी महाविद्यालयातून पदवीत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना समर स्कूलची संधी दिली जाते, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग मिळावे व त्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती वाढीस लागावी या उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जातो. सदर योजनेअंतर्गत भारतभरातून विविध राज्यांमधून विद्यार्थी सहभागी होत असतात त्यामध्ये पारनेर महाविद्यालयाला संधी मिळाली ही अभिमानास्पद बाब आहे. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग सातत्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवत असतो, तसेच दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विविध राष्ट्रीय पातळीवरील संस्थांबरोबर करारबद्ध झालेले आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येतात, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिलीप ठुबे यांनी केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना अशी संधी भेटणे ही गोष्ट अतिशय दुर्लभ असून, आम्हाला मिळालेल्या या संधीचं आम्ही सोनं करू असे मत निवड झालेल्या विद्यार्थिनींनी व्यक्त केले.
या सर्व निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थिनीं चे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आ. नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे पाटील व सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील होतकरू, कष्टाळू आणि परिस्थितीची जाणीव असलेल्या विद्यार्थिनींना अशी संधी मिळाली ही कौतुकाची बाबा आहे. आसे विद्यार्थी पारनेर महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने उंचावत आहेत, असे मत माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर यांनी व्यक्त केले.