मुंबईत ‘आरोग्य आधार कार्ड’ साठीची नाव नोंदणी सुरू – प्रतिक कांबळे

भोईवाडा, मुंबई – जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला कधी ना कधी हॉस्पिटलमध्ये जावेच लागते, मात्र आता हॉस्पिटलमध्ये जाणे तितकेसे सोपे राहिलेले नाही असेच सामान्य माणसाला वाटत आहे. कॅन्सर व त्यावरील सर्व शस्त्रक्रिया, बायपास, एन्जिओप्लास्टी, पोटाचे आतड्याचे विकार, किडनी ऑपरेशन, मेंदूचे – फुफ्फुसे – यकृत आदींचे ऑपरेशन, हाडांचे ऑपरेशन अशा कोणत्याही रोगावर उपचारासाठी आपण हॉस्पिटलमध्ये जायचे ठरवले तर लाखो रुपयांचे बिल आपल्याला येते. त्यामुळेच महागड्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची सर्वसामान्य माणसाला भीती वाटते. मात्र आता कुणालाही घाबरण्याची गरज नाही, कारण रुग्ण हक्क परिषद आणि विश्वशांती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पीएमएफ ‘आरोग्य आधार कार्डची’ नोंदणी भोईवाडा येथे उत्साहात सुरू झाल्याची माहिती विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी दिली.
यावेळी बेस्ट कामगार क्रांती संघाचे उपाध्यक्ष मा. तानाजी मोरे यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या आणि विश्वशांती सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी स्वतःसह कुटुंबाचे आरोग्य आधार कार्ड बनवून घेतले व योजनेचा शुभारंभ केला.
प्रतीक कांबळे बोलताना पुढे म्हणाले की, आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, प्रधानमंत्री सहाय्यता निधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपचार निधी- नवी दिल्ली तसेच रुग्णांचे संपूर्ण बिल माफ करणारी आयपीएफ योजना अशा सर्व योजनांच्या निधीद्वारे प्रत्येक रुग्णाला 15 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकतात. मात्र सर्वसामान्य माणसाला मोफत उपचार कसे मिळवावेत? किंवा हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? याबद्दल कोणतीही माहिती नसते. पीएमएफ च्या ‘आरोग्य आधार कार्ड’द्वारे प्रत्येक रुग्णाला लाखो रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील, यासाठी आम्ही प्रयत्न करू तरी जास्तीत जास्त लोकांनी आरोग्य आधार कार्ड साठी आपले नाव नोंदविले पाहिजे, असे आवाहनही प्रतीक कांबळे यांनी यावेळी केले.
रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आजपर्यंत 25 हजाराहून अधिक रुग्णांची लाखो रुपयांची बिले माफ करण्यात आलेली आहेत. यामध्ये माफ केलेल्या बिलांची आकडेवारीची बेरीज केली तर ही रक्कम 500 कोटींपेक्षा अधिक आहे. प्रत्येक रुग्णाला लाखो रुपयांचा निधी कसा मिळेल, यासाठीच रुग्ण हक्क परिषद गेल्या 14 वर्षांपासून काम करीत आहे.
जुलै 2023 मध्ये रुग्ण हक्क परिषदेचे मुंबई प्रदेश कार्यालय व स्वस्त औषध दुकान देखील भोईवाडा, परेल येथे सुरू होणार असल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्य आधार कार्डच्या माध्यमातून उपचारांसाठीचा मोठा फायदा होणार आहे.