महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बालगृहातील मुलींना विजेतेपद!

पुणे- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने 28 ते 30 जानेवारी 2023 दरम्यान पुणे जिल्यातील बालगृहातील बालकांसाठी चाचा नेहरू बालमहोत्सव आयोजित केला होता. त्यामध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वेणुबाई बालगृहातील मुलींनी सर्वाधिक बक्षीसे मिळवून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
त्यामुळे संस्थेच्या बालगृहातील मुलींची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली. या स्पर्धा १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान सांगली येथील जिल्हा क्रीडा संकुलात झाल्या. या स्पर्धेत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर अशा पाच जिल्ह्यांमधील बालगृहांचा सहभाग होता.
संस्थेच्या बालगृहातील एकूण 11 मुलींनी विविध स्पर्धेत भाग घेतला होता. त्यापैकी पाच क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या मुलींनी बक्षीसे मिळवल्याने सर्वसाधारण विजेतेपदाचा मानही आपल्या संस्थेच्या मुलींना मिळाला. पुण्याचे विभागीय उपआयुक्त संजय माने आणि सांगली येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्या हस्ते मुलींना बक्षीसे देण्यात आली.
बालगृहातील यशस्वी मुलींचे अभिनंदन
- खो – खो – कर्वे संस्था बालगृह, प्रथम क्रमांक
- रिले – 400 मीटर – प्रथम क्रमांक. (संघातील धावपटू) कु. रेणुका चिकणे, कु. चंद्रिका मोटे, कु. यल्लेश्वरी, कु. सृष्टी चतुर
- वैयक्तिक नृत्य – कु. मणीलक्ष्मी सिडगिद्धी – प्रथम क्रमांक
- वक्तृत्व स्पर्धा – कु. पूजा वाघमोडे.- प्रथम क्रमांक
- धावणे – कु. सृष्टी चतुर – तृतीय क्रमांक.
सदर बालमहोत्सवा साठी पाच ही जिल्ह्याचे शासकीय अधिकारी, प्रतिनिधी, संस्था प्रतिनिधी व बालके असे अंदाजे एकूण 400 जण उपस्थित होते. सांगलीहून विजेतपद मिळवून आल्यानंतर मुलींनी वसतिगृहाने आनंदाने जल्लोष केला.