मेट्रो सिटी न्यूज

पुण्यातील विश्रामबाग पोलिसांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात रुग्ण हक्क परिषदेचा आंदोलनाचा इशारा


दत्ता ठुबे
पुणे:-पुणे शहर पोलीस दलाच्या अंतर्गत असणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वच प्रकारचे अवैध धंदे अगदी जोरदार सुरू आहेत…
येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत. महिला मुली सुरक्षित नाहीत. नुकताच विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला होण्याचा प्रकार विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला ज्याने राज्यात स्त्रियांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाले.
मोबाईल चोरीच्या घटना तर दररोज घडत आहेत. सोन्याची खरेदी विक्री करणाऱ्या सराफांच्या भ्रष्ट कार्यपद्धतीमुळे मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीचे सोने खरेदी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असे प्रश्न जनतेला दररोज पडत आहेत.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या होस्टेलवर ( वसतीगृह ) तसेच हॉस्टेल सुरू ठेवण्याच्या अनधिकृत पद्धतीमुळे नेमका कोणत्या प्रकारचा मलिदा कोणाला खायला भेटतो? याबद्दल अत्यंत वाईट चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सर्व लॉज आणि हॉटेल्स मध्ये अत्यंत वाईट पद्धतीने शरीरविक्रय, वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येते.
मसाज पार्लरच्या नावाखाली आणि इतर अनेक प्रकारे वेश्याव्यवसायाचे पीक विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरपूर वाढलेले दिसत आहे. हे वेश्या व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? यातून नेमके काय साध्य करायचे आहे? पुणे शहराचा केंद्रबिंदू असलेल्या सदाशिव, नारायण आणि शनिवार पेठेत अशा पद्धतीचे प्रकार सुरू आहेत का? यातून पुणेकर म्हणून आम्ही कोणता आदर्श घ्यायचा?
व्हेज नॉनव्हेज हॉटेल पुढे होणारी गर्दी, खानावळींच्या पुढे होणारी गर्दी एकंदरीत लक्ष्मी रोडवरील सर्वच व्यापारी दुकानदार आणि दारू, मटका, जुगार चालक यांच्याकडून करण्यात येणाऱ्या हप्ते वसुलीमुळे येथील नागरिक भयभीत आणि दयनीय अवस्थेतील जीवन जगत आहेत. पोलिसांच्या सुस्त, अकार्यक्षम कार्यपद्धतीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवरच दडपशाही करणे, कार्यकर्त्यांवर खोटे आणि चुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करून अवैध धंदे चालकांना संरक्षण देण्याचे काम करणाऱ्या तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच बेकायदेशीर बाबींचा रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच चाललेले हे सर्व गोरखधंदे तात्काळ बंद व्हावेत, म्हणून मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या इमारतीसमोर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, बुधवार चौक, पुणे येथे तीव्र लक्षवेधी धरणे आंदोलन समस्त नागरिकांच्या सहभागाने व आमच्या समविचारी पक्ष संघटनांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे,

सदर आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी पुणे शहर पोलीस दल जबाबदार राहील.असे निवेदन रुग्ण हक्क परिषदेचे सौ. अपर्णा साठ्ये – मारणे(अध्यक्ष, पुणे शहर)सौ.कविताताई दादर
(उपाध्यक्ष, पुणे शहर) सौ. चित्राताई साळवे,
(सचिव, पुणे शहर ) सौ. प्रभाताई अवलेलु (संघटक, पुणे शहर) श्री.संजय जोशी ( केंद्रीय कार्यालयीन सचिव)
यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,महाराष्ट्राचे गृहमंत्री,
पालकमंत्री,पुणे,पोलिस आयुक्त,पुणे शहर,पोलिस निरीक्षक,विश्रामबाग, जिल्हाधिकारी,रजिस्टार,पुणे, जिल्हा सत्र न्यायालय,पुणे,श्रमिक पत्रकार संघ,पुणे
यांना देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button