मणिपूर घटनेवर अण्णा हजारे संतापले, मोदी सरकारला फटकारत म्हणाले…

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी:_
मणिपूरमध्ये जमावाकडून दोन महिलांना पकडण्यात आलं. त्यानंतर त्यांना विवस्त्र करुन त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. देशभरात या घटनेचा निषेध होतो आहे. अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत मोदी सरकारला फटकारले आहे .
अण्णा हजारे म्हणाले, मणिपूरच घटना निंदनीय आहे. आपल्या संस्कृतीत स्त्रिला मातेचा मान आहे. त्यामुळे मातेची अशी विवस्त्र धिंड काढणाऱ्या नराधमांना फासावर लटकविले पाहिजे. विशेष म्हणजे या घटनेवर केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे. यावरून कायदा व सुव्यवस्था बिघड्याचे दिसून येत आहे. आपल्या देशात महिलांवर असे अत्याचार होत असतील तर ही गोष्ट बरोबर नाही. यावर आपण केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहोत, असे अण्णा हजारे यांनी म्हटले.
दिल्लीत निर्भयावर अन्याय झाला होता, तेव्हा मी एक वर्षाहून अधिक काळ मौन व्रत केले होते. यातील आरोपांना फाशीची शिक्षा द्या, अशी मी मागणी केली होती. ज्या दिवशी आरोपींना फाशीची शिक्षा झाली, त्याच दिवशी मी मौन व्रत सोडले होते. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीच दिली पाहिजे. मणिपूरच्या घटनेतील एका महिलेचे पती सैनिक होते. जो सैनिक आपल्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात आहे, त्याच्या पत्नीवर असा अन्याय होणे योग्य नाही. आमच्यातील मानवतेवर हा मोठा कलंक आहे. एक स्त्री आमची बहीण- आई आहे, तिच्यावर असा अत्याचार होणे हे गंभीर आहे, याकडे आपण नक्कीच केंद्र सरकारचे लक्ष वेधणार आहोत, असेही हजारे म्हणाले .
मणिपूरमध्ये पुन्हा भडका! महिलांवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचं घर संतप्त जमावाने पेटवलं
दरम्यान, आज मी लोकशाहीच्या या मंदिराजवळ उभा आहे आणि माझं हृदय वेदना आणि संतापाने भरून आलंय. मणिपूरमध्ये जी घटना समोर आली आहे ती कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. या घटनेने संपूर्ण देशाचा अपमान होत आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कधीही माफ केले जाऊ शकत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यानंतर तात्काळ कारवाई आदेश देखील देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर कठोर पाऊलं उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.