समृद्धी टोलनाक्यावर तोडफोड करणाऱ्या 8 जणांना अटक; 1 दिवसाची पोलीस कोठडी

नाशिक –हिंदुऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या टप्पा क्रमांक दोन मध्ये येणाऱ्या सिन्नर तालुक्यातील गोंदे इंटरचेंज येथील टोलनाक्याची तोडफोड करणाऱ्या संशयीतांपैकी 8 जणांना वावी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली.
यातील काहीजण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबंधित असून सर्वजण नाशिक शहर व जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सोमवारी या सर्वांना सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे शनिवारी रात्री शिर्डी येथून समृद्धी महामार्गावरून नाशिककडे प्रवास करत होते. सिन्नर तालुक्यातील गोंदे इंटरचेंज येथील टोलनाक्यावरून खाली उतरून ते नाशिक पुणे महामार्गाने नाशिककडे जाणार होते.
मात्र टोलनाक्यावर फास्टटॅग स्कॅन होत नसल्याचे कारण सांगत त्यांचे वाहन अडवून ठेवण्यात आले होते. ओळख सांगूनही श्री. ठाकरे यांचे वाहन थांबवून ठेवण्यात आल्याचा प्रकार संताप जनक असल्याचा आरोप करत रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने घोषणा देत या टोलनाक्याची तोडफोड केल्याचा प्रकार घडला होता.
याप्रकरणी टोलनाका व्यवस्थापकाने वावी पोलीस ठाण्यात अज्ञात 15 जणांच्या विरोधात सुमारे चार लाख रुपयांच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
रविवारी दुपारी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे, निफाडचे प्रभारी उप अधीक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, उपनिरीक्षक बी.आर .आहेर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तपास करत त्याच दिवशी सायंकाळी आठ ते दहा संशयीतांना ताब्यात घेतले होते.
त्यांची पोलीस ठाण्यात कसून चौकशी केल्यानंतर व थोडफोडीच्या घटनेत सहभाग असल्याचे निश्चित झाल्यानंतर आठ जणांना रात्री उशिरा अटक करण्यात आली.
पोलिसांनी घटनेत वापरलेली स्कार्पिओ जीप देखील ताब्यात घेतली. अटक केलेल्या सर्वांना सोमवारी दुपारी सिन्नर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या सर्वांना एक दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.
यांना झाली अटक…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक शहराध्यक्ष ललित नरेश वाघ (28) रा. पवननगर सिडको, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव शुभम सिद्धार्थ थोरात (27) रा. दत्त चौक सिडको, मनसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत शालिग्राम चौधरी (35) रा. कलानगर जेलरोड, मनसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाजीराव बाळासाहेब मते (34) रा. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नाशिकरोड, स्वप्निल संजय पाटोळे (28) रा. कामटवाडे शिवार, मेघराज शाम नवले (29) रा. पाथर्डी फाटा, प्रतीक माधव राजगुरू (23 ) रा. सावता नगर सिडको, शैलेश नारायण शेलार (31) रा खेरवाडी ता. निफाड