अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी प्रा. विलास नवले

अकोले /प्रतिनिधी –
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. प्रा. विलास भिकाजी नवले यांची निवड झाली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी आघाडीने भारतीय कम्युनिस्ट पक्ष व माकप यांचा प्रत्येकी एक स्वीकृत संचालक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भाकपच्या वतीने कॉ. शांताराम वाळुंज यांना स्वीकृत संचालकपद देण्यात आले होते. त्यांच्या आकस्मित निधनानंतर ती जागा रिक्त झाली आहे. या जागेवर कॉ. नवले यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. सत्ताधारी आघाडीच्या वतीने आमदार डॉ. किरण लहामटे, कारखान्याचे अध्यक्ष सिताराम गायकर, उपाध्यक्ष सुनीता भांगरे व सर्व संचालकांनी या निर्णयास संमती देत प्रा.नवले यांची निवड जाहीर केली आहे. या निवडीबद्दल आमदार डॉ. किरण लहामटे, अध्यक्ष सितारामपाटील गायकर, जिल्हा बँकेचे संचालक मधुकर नवले, कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे, राज्य सचिव कॉ.बन्सी सातपुते जेष्ठ नेते कॉ. कारभारी उगले व भाकपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नवले यांचे अभिनंदन केले आहे. प्रा. नवले हे राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेत तीस वर्षे कार्यरत होते. तसेच त्यांच्या कुटुंबाला स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आहे. ते सध्या भाकपच्या जिल्हा कार्यकारिणीत सदस्य म्हणून कार्यरत आहेत.