स्वर्गीय देविदास शेलार यांना राजूर येथे अनेकांनी वाहिली श्रद्धांजली !

राजूर /प्रतिनिधी
स्व देविदास शेलार यांच्या शोक सभेचे आयोजन श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात केले होते.यावेळी शोकसभेचे अध्यक्षस्थान संपतराव चोथवे यांना देण्यात आले. यावेळी गणपतराव देशमुख, शांताराम काळे, संतोष बनसोडे, गोकुळ कानकाटे, भास्कर येलमामे उपस्थित होते. वंदनीय माजी मंत्री मधुकरराव पिचड तसेच मा.आ.वैभवराव पिचड यांचे स्वीय सहाय्यक, श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेचे कोषाध्यक्ष, तसेच आदिवासी उन्नती सेवा मंडळ कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन अशा विविध पदांवर कार्यरत असताना मंगळवार दिनांक 25.7.2023 रोजी सकाळी आठ वाजता त्यांचे वयाच्या 53 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या श्रद्धांजलीपर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावातील विविध सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भास्कर येलमामे यांनी श्रद्धांजलीपर मनोगतात सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य कार्यकर्तृत्व त्यांनी निर्माण केले. सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय, कौटुंबिक सर्व स्तरावर आपला ठसा उमटवला. कोणतीही असाध्य गोष्ट किती परिश्रमाने व कष्टाने, कशी साध्य करता येते, याचे ज्ञान त्यांच्याकडे होते. त्यांच्या अक्षराइतकेच त्यांचे व्यक्तिमत्वही सुंदर होते. त्यांच्याकडे सर्वांचे समाधान होईल अशा पद्धतीचे कौशल्य होते. त्यामुळेच अशक्य गोष्टीही ते सहज साध्य करीत असत, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी श्रद्धांजलीपर बऱ्याच मान्यवरांनी त्यांच्या जीवनपटावर भाष्य केले व त्यांच्या संघर्ष व समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेल्या गौरव कार्यावर प्रकाशझोत टाकला. त्यांची समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणारी तळमळ ,त्यासाठी ते करत असलेली धडपड यावर सर्वांनी प्रकाश टाकला त्यांच्या निस्पृह व निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाचा झालेला फायदा, प्रत्येक व्यक्तीचा वाढलेला आत्मविश्वास या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.त्यांच्यातील एकूणच सर्व व्यक्तिमत्वातील सदगुणांच्या व त्यामुळे झालेल्या समाजहिताचा पाढाच सर्वांनी वाचला
यावेळी सुनील सोनार,मुख्याध्यापक विलास महाले ,प्राचार्य मंजुषा काळे, भास्करराव येलमामे, गोकुळशेठ कानकाटे, सचिव शांताराम काळे ,उपसरपंच संतोष बनसोडे, सरपंच गणपतराव देशमुख, संपतराव चोथवे ,नंदू चोथवे ,रामशेठ पन्हाळे, शेखर वालझाडे, विनायक घाटकर, विलास तुपे गणेश चोथवे,जनार्दन मोरे, प्रेमानंद पवार जगन्नाथ मुतडक आदी मान्यवरांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. यावेळी बऱ्याच मान्यवरांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. त्यांच्याशी असणाऱ्या भावनिक एकरूपतेची साक्ष त्यांच्या डोळ्यातील अश्रू देत होते. सर्वांनीच त्यांना साश्रूनयनाने श्रद्धांजली अर्पण करून सामुदायिक पसायदान घेऊन शोकसभा संपविण्यात आले. यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारे ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन किरण भागवत यांनी केले.