अरविंद गाडेकर यांना जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहीर

संगमनेर – संगमनेर येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे स्वलिखित आणि स्वचित्रित पुस्तक सासू व्हर्सेस सून या पुस्तकास जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सासू आणि सुनेच्या नात्यातील विविध प्रकारचे कौटुंबिक विनोदाचे मजेशीर प्रसंग व्यंगचित्रातून आणि मार्मिक शब्दातून व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी मांडले आहेत.
पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन लवकरच होणार असून त्यामध्ये पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. स्मृतिचिन्ह , सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे.
अरविंद गाडेकर यांची व्यंगचित्रे व्यंगचित्राच्या माध्यमातून दैनिक, साप्ताहिक, दिवाळी अंक, सोशल मीडिया मध्ये प्रसिद्ध होत असून आतापर्यंत अकरा हजार व्यंगचित्रे साकारली आहेत. अखिल भारतीय आणि आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र प्रदर्शनात त्यांची व्यंगचित्रे झळकली आहेत. त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असून साहित्य क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. त्यांच्या या पुरस्काराबाबत सर्वत्र अभिनंदन होत आहे.