धनंजय मोहिते यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर
राजूर- राजूर येथील ॲड. एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी धनंजय मोहिते यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान केले जातात. उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी, उत्कृष्ट जिल्हा समन्वयक, उत्कृष्ट स्वयंसेवक, स्वयंसेवक प्रशंसा पुरस्कार असे विविध पुरस्कार विद्यापीठ व जिल्हा स्तरावरील दिले जातात. याशिवाय राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांची शिफारस केली जाते.

देशमुख महाविद्यालयाच्या धनंजय मोहिते या स्वयंसेवकास २०२०-२१ सालचा प्रशंसा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०१८ ते २०२१ या काळात कोरोना महामारीच्या संकटामुळे हे पुरस्कार वितरण झाले नाही. त्यामुळे ४ ऑगस्ट २०२३ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामदेव सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. धनंजय मोहिते हा ॲड. एम. एन. देशमुख महाविद्यालयाचा अत्यंत धडपड्या, उत्साही वृत्तीचा विद्यार्थी आहे. त्याने महाविद्यालयाच्या व विद्यापीठाच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेतला. त्याने कोरोना महामारीच्या काळात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन पवार प्रा . डॉ. राजेंद्र सोनवणे, प्रा. डॉ. दीपमाला तांबे प्रा. संतोष अस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसोबत कोरोना महामारीच्या जनजागृतीसाठी भारुड तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच राजुर व इतर गावांच्या चौकांमध्ये रांगोळ्या काढून जनजागृती केली. याशिवाय त्याने विद्यापीठाच्या ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी’ या उपक्रमातही सहभाग घेतला. त्याने वारीत सहभागी होऊन तेथेही पथनाट्य बसवून स्वच्छता, पर्यावरण व वृक्षारोपण संबंधित जनजागृती केली.
याशिवाय त्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय शिबिरांमध्ये सहभाग घेतला व तेथेही आपल्या गुणांची चमक दाखवली. धनंजयच्या या यशाबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड. एम. एन. देशमुखसाहेब, संस्थेचे सचिव व माजी प्राचार्य टी .एन.कानवडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ . बी.वाय.देशमुख सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे आजी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. लहू काकडे, प्रा. बबन थोरात, प्रा. डॉ. दीपमाला तांबे व माजी कार्यक्रम अधिकाऱ्यांनी व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.