…तर 7 जूनला टाकेद 48 आदिवासी कुटुंबीयांचा बिऱ्हाड मोर्चा,टाकेद येथील ग्रामस्थांचा बीडीओंना इशारा

डॉ.शाम जाधव
इगतपुरी, ता.१४ : इगतपुरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथील आदिम कातकरी वस्तीतील जवळपास ४८ कुटुंबियांचे प्रधानमंत्री जण मन आवास योजने अंतर्गत घरकुल गेल्या दोन वर्षांपासून मंजूर आहे परंतु स्थानिक ग्रामपंचायत व इगतपुरी पंचायत समिती प्रशासनाने जागेच्या अटीमुळे या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुल अनुदान वर्ग न करता सर्वांना आजपर्यंत लाभापासून वंचित ठेवले आहे.जर ६ जूनपर्यंत घरकुलांचा प्रश्न सोडवला नाही आणि या सर्व मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाही तर येत्या ७ जूनला सर्व ४८ आदिम कातकरी कुटुंबियांसह बिऱ्हाड मोर्चासह आपले कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांचे नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थांच्या वतीने इगतपुरी पंचायत समिती गट विकास अधिकारी एम एस वळवी यांना मंगळवार ता.१३ दरम्यान निवेदनाद्वारे अल्टीमेटम देण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत टाकेद बु येथील कातकरी वस्ती ही ग्रामपंचायत गावठाण जागेत प्राथमिक आरोग्य उप केंद्र परिसरात होती सन २००४-०५ साली तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व प्रशासनाने या आदिम कातकरी ग्रामस्थांना इंदिरा घरकुल आवास योजनेचा लाभ देणे कामी येथून स्थलांतरित करून त्यांना गट नंबर १५४ सरकार ,मोफत पडित म्हसनवटा व्यवस्थापन

ग्रामपंचायतकडे या सरकारी गटामध्ये स्थलांतरित केले व तत्कालीन इंदिरा आवास योजनेच्या घरकुलांचा लाभ दिला,व पूर्वापार ज्या जागेवर आदिम कातकरी समाज बांधव राहत होते त्या गावठाण जागेवरून आदिम कातकरी बांधवांना स्थलांतरित करून ती जागा गावातील इतरत्र बड्या श्रीमंतांना द्रव्याच्या हव्यासपोटी देण्यात आली आज मितीस त्या जागेवर मोठी बिल्डिंग उभी आहे.यानंतर सन २००४-०५ सालापासून ते आजपर्यंत गट नंबर १५४ या सरकारी जागेत सर्व आदिम कातकरी कुटुंब वास्तव्यास असून आजपर्यंत त्यांच्या घराची ग्रामपंचायत नमुना नंबर ८ ड ला नोंद आहे व आजही सरकारी जागेत असतांना सुद्धा नियमितपणे रीतसर ग्रामपंचायत कर भरत आहे.असे असतांना सन २०२३-२४ या वर्षात प्रधानमंत्री जण मन आवास घरकुल योजनेचे सर्वेक्षण झाले व लोकसंख्या वाढीनुसार टाकेद येथील जवळपास ४८ कुटुंबियांचे घरकुल मंजूर झाले.यापैकी ३२घरकुल आज मितीस मंजूर असून काही ऑनलाइन सर्वेक्षणात घेतले आहे.असे असतांना केवळ सरकारी जागेत ही आदिम वस्ती कुटुंबे वास्तव्यास असल्याने जागेच्या कारणावरून घरकुले मंजूर असून सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यावर अद्यापही घरकुलांचा निधी वर्ग केला नाही.या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत व इगतपुरी पंचायत समिती प्रशासनाला अनेकवेळा सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांचे नेतृत्वाखाली निवेदन प्रस्ताव अर्ज फाटे देण्यात आले.परंतु अजूनही हा विषय मार्गी लागलेला नाही.हा प्रश्न सोडविण्यात यावा म्हणून ज्या गटात कातकरी वस्ती राहते त्या गटाची ग्रामविकास अधिकारी विजय रासकर यांनी सरकारी मोजणी टाकलेली आहे.व तसा गावठाण विस्ताराचा प्रस्ताव पण शासन दरबारी देण्यात आला आहे.यासोबतच तीन दोन चा प्रस्ताव देखील तयार करून पाठविण्यात आला असल्याचे ग्रामविकास अधिकारी यांचे म्हणणे आहे.तीन दोन च्या जागे संदर्भात ग्रामविकास अधिकारी रासकर यांनी गावात कुणालाच न कळवता परस्पर शिरेवाडी येथे ग्रामसभेचे आयोजन केले होते परंतु ग्रामस्थांना माहीत नसल्याने सदर ग्रामसभा तहकूब करण्यात आली.शिरेवाडी येथील वन विभागाच्या जागेत सदर कातकरी कुटुंबियांना घरकुल बांधण्यास जागा उपलब्ध करून दिली जाईल असे ग्रामविकास अधिकारी रासकर यांचे म्हणणे आहे परंतु पुन्हा प्रश्न पडतो गावातील सरकारी जागेतून पुन्हा स्थलांतरित होऊन डोंगर दऱ्यांमधे गाव सोडून जीव धोक्यात घालून कातकरी कुटुंबीयांनी राहण्यासाठी का जावं.?फक्त गोरगरीब जनतेला स्थलांतरित करायचं आणि त्यांच्या हक्काच्या जागा द्रव्याच्या हव्यासापोटी बड्या श्रीमंतांना द्यायच्या हाच पॅटर्न टाकेद मध्ये चालू आहे. याला सर्व प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार असून आजपर्यंत या प्रश्नाकडे सर्वांनी दुर्लक्ष केल आहे.
तरी आम्ही गाव सोडून दुसऱ्या डोंगर दऱ्यांमधील जागेत राहायला जाणार नाही.सण 2011 च्या अगोदर पासून आम्ही शासकीय गट नंबर 154 या जागेत राहतोय त्यामुळे 2011 च्या अगोदरचे सरकारी जागेतील अतिक्रमण हे अधिकृत करण्यात यावे असा महाराष्ट्र शासनाचा निर्णय देखील याअगोदर झालेला आहे तरी आम्ही आहे त्याच जागेत राहू व याच जागेत घरकुल बांधकाम करण्यास आम्हाला प्रशासनाने परवानगी द्यावी.याअगोदर प्रशासनाला अनेकदा वेळोवेळी अर्ज फाटे विनंती निवेदन कागदपत्रे प्रस्ताव देऊनही आमचा हा विषय सुटत नसेल व प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर असूनही आमच्या खात्यावर येत्या 6 जूनपर्यंत जर पैसे जमा झाले नाही व आमचा घरकुलांचा जागेसह प्रश्न प्रशासनाने सोडवला नाही तर येत्या 7 जून रोजी सर्व कुटुंबियासमवेत आम्ही सर्व कुटुंबासह बिऱ्हाड घेऊन आपले पंचायत समिती कार्यालयात धडक मोर्चा आंदोलन करू याला सर्वस्वी प्रशासन म्हणून आपण जबाबदार असणार असा अल्टीमेंटम इशारा सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांचे नेतृत्वाखाली सर्व कातकरी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी एम एस वळवी यांना दिला आहे.
“वीस वर्षांपूर्वी आम्हाला हक्काच्या गावठाण जागेतून उठवून सरकारी गटात टाकले आता घरकुले मंजूर असून केवळ जागेचे कारण देऊन आंमचे स्थलांतर करायचे व अमच्या जागा बड्या श्रीमंतांना बिल्डिंग बांधण्यासाठी द्यायच्या व पुन्हा आम्हाला स्थलांतरित करण्याचा हा स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा घाट आहे.प्रशासनाने आमची वेळीच दखल घ्यावी अन्यथा ७ जूनला बिऱ्हाड मोर्चा घेऊन पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करू.”
– निवृत्ती हिलम,ग्रामस्त,आदिम कातकरी वस्ती
“