इथापे नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य सोनवणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा-ज्ञानेश्वर लेंडे

अकोले/प्रतिनिधी–
इथापे नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री.सोनवणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्ञानेश्वर लेंडे यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की भवारी रुपाली ज्ञानेश्वर या विद्यार्थीनीने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात GNM कोर्स च्या प्रथम वर्गात प्रवेश घेतला होता. यावेळी रुपाली भवारी या विद्यार्थिनीने ५०००/- रुपये इतकी फी सदर कॉलेजला जमा केली होती.
परंतु ही विद्यार्थिनी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना यादरम्यान इतर विद्यार्थ्यांप्रमाणे तिची कोणतीही परीक्षा घेण्यात आली नाही. याबाबत विद्यार्थिनीने प्राचार्य श्री.सोनवणे यांना वेळोवेळी पुनःश्च विचारणा केली असता वर्गांची विभागणी A,B,C अशा तुकड्यांमध्ये करण्यात आल्याचे सांगितले.
याच काळात सदर विद्यार्थीनीकडून शिष्यवृत्तीचा अर्ज जमा करण्यात आला. हे सर्व होत असताना महाविद्यालयाने रुपाली ज्ञानेश्वर भवारी या विद्यार्थीनीला परीक्षा फी भरल्याची पावती खोट्या स्वरूपाची दिली आहे. तसेच प्रथम वर्षात उत्तीर्ण न होता विनापरिक्षा द्वितीय वर्षात शिक्षण घेत असल्याचे बोनफाईड सर्टिफिकेट या विद्यार्थिनीला दिले गेले.
अशा प्रकारे वामनराव इथापे चे प्राचार्य श्री. सोनवणे यांनी शासन व विद्यार्थिनीची मोठ्या प्रमाणात फसवणूक करून आजच्या स्थितीला मूळ कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत आहेत. म्हणूनच वामनराव इथापे नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सोनवणे यांच्यावर आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय राजूर यांच्या वतीने सखोल चौकशी करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी ज्ञानेश्वर लेंडे यांनी प्रकल्प अधिकारी राजूर यांचेकडे केली आहे .