राजुर पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन साजरे!

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी निरागसता जपत ज्ञानाने व कर्तुत्वाने मोठे होऊन देशासाठी काम करा असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी केले. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेचे सचिव शांताराम काळे, प्राचार्य मंजुषा काळे ,पोलीस उपनिरीक्षक शेख उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजाच्या सुरक्षिततेसाठी घड्याळाकडे न पाहता 24 तास कार्यरत असणाऱ्या पोलीस दादांच्या भावना लक्षात घेतल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी न मिळाल्याने किंवा बहिणीकडे जाण्यासाठी न जमल्याने निराश न होता आम्ही भगिनी राख्या बांधण्यासाठी आलो आहोत. हातावर बांधलेल्या राखीकडे पाहून निश्चितच पोलीस दादा समाधानी होतील या उद्देशाने विद्यालयातील विद्यार्थिनींचा चमू पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस दादांना राखी बांधण्यासाठी उपस्थित होता .अतिशय भावनिक अशा रक्षाबंधन कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनींनी पोलीस दादांना राख्या बांधल्या यावेळी गायत्री देशमुख ,श्रद्धा मुतडक, सलोनी जगताप यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दातरे यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत ही निरागसता अशीच जपा. ज्ञानाने व कर्तृत्वाने मोठ्या होऊन देशासाठी काम करा. निश्चितच आमच्या विद्यार्थिनी ताईंच्या भावना आम्हा पोलीस दादांपर्यंत पोहोचल्या. आम्हाला रक्षाबंधनाला घरी जाण्याची उणीव तुम्ही भरून काढली अशा भावना व्यक्त केल्या. विद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा काळे यांनीही सर्व पोलीस बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कामाच्या व्यापामुळे त्यांना सण साजरी करण्यासाठी वेळ मिळेल किंवा नाही हे सांगता येत नाही म्हणून माझ्या विद्यालयातील मुलींना घेऊन हा कार्यक्रम आम्ही साजरी केला असे त्यांनी सांगितले. यावेळी मिष्टान्न व विद्यार्थ्यांचे हत्यार असलेली लेखणी सर्व विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी ठाणे अंमलदार सह सर्व पोलीस कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी केले तर आभार किरण भागवत यांनी मानले.
