विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमात मुस्लिम मराठी साहित्यिकांच्या साहित्या चा समावेश करावा

अहमदनगर-विद्यापीठ स्तरावरील पदवी व पदव्युत्तर पदवी मराठी भाषा अभ्यासक्रमात साहित्याचे विविध प्रवाह यात मुस्लिम मराठी साहित्याचा समावेश करावा यासाठी ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेने पुढाकार घेतला आहे.
त्यासाठी नुकतेच पीपल्स कॉलेज नांदेड येथे स्वा.रा.ती.म. विद्यापीठ व पीपल्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या एम.ए. मराठीच्या नवीन अभ्यासक्रमावरील कार्यशाळेच्या पूर्वी मराठी भाषा अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. मा. मा. जाधव यांना ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्यावतीने लेखी निवेदन दिले आहे.
प्रस्तुत कार्यशाळेत अभ्यासक्रमाच्या विविध पैलूंवर गंभीर विचारमंथन झाले असले तरी यापूर्वीच्या अभ्यासक्रमात ” मुस्लिम मराठी साहित्याला ” योग्य असे प्रतिनिधीत्व दिले नाही. असे अभ्यासक्रमाच्या पुस्तकावरून दिसून येते.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत होते. नवीन अभ्यासक्रमाचे स्वरूप या विषयांवर गंभीर चर्चा झाली. त्यामध्ये मराठी वाङ्मयाचा इतिहास, वर्णनात्मक व समाजभाषा विज्ञान व साहित्य प्रवाहांचा अभ्यास, अभ्यासक्रम व अभ्यासपत्रिकांचे प्रारूप, मराठवाड्याचे मराठी साहित्य, लोकसाहित्य, नाटक आणि चित्रपट व भाषा व साहित्य संशोधन यावर डॉ. अनंत राऊत डॉ. कमलाकर चव्हाण, डॉ. निलेश लोंढे, डॉ. राजाराम झोडगे, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ. आनंद भंडारे यांनी आपले विचार मांडले.
यापुढील नव्या अभ्यासक्रमात विद्यापीठ क्षेत्रातील मुस्लिम मराठी साहित्यिकांच्या साहित्याला पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश करुन मराठी भाषा अभ्यासक्रम समृध्द करावा अशी मागणी मराठी भाषा समिती अध्यक्ष डाॅ. मा.मा. जाधव व सदस्य डाॅ. कमलाकर चव्हाण यांच्याकडे ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक कवी शफी बोल्डेकर यांनी केली आहे.