इतर

जखणगांव नगर ते पंढरपुर दिंडीला महिलांचा प्रचंड प्रतिसाद


दत्ता ठुबे
नगर प्रतिनिधी:-आरोग्य ग्राम जखणगांव ता नगर येथुन गेल्या ११ वर्षापासुन दरवर्षी पंढरपूरला एकदिवसीय दिंडी जात असते.
यंदाही जखणगांव नगर ते पंढरपुर अशी दिंडी सरपंच डॉ. सुनिल गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.
यंदा शासनाने महिलांना एस टी प्रवासात सवलत दिल्यामुळे महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला
एकुण आठ बसेस मध्ये ५००भाविक या दिंडी मध्ये सामील झाले होते. यात २५० च्या वर महिला होत्या व १०० जेष्ठ नागरिकांचा सहभाग होता
असा महिलांचा ऊत्फुर्त प्रतिसाद पाहुन खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी महिला व जेष्ठ नागरिकांच्या प्रवासभाड्याचा भार स्वतः उचलला. उर्वरित सवलत विना प्रवाशांचा प्रवास खर्च आरोग्य ग्राम जखणगांव चे लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी केला.
या दिंडीला जखणगांव चे आराध्यदैवत हटकेश्वर व ग्रामदैवत दक्षिणाभिमुखी मारूती यांच्या दर्शनाने सुरुवात झाली.
या दिंडी सोहळ्यास जखणगांव, हिंगणगाव, हिवरेबाजार, टाकळी खातगांव,निमगाव वाघा,नेप्ती,शिर्डी,राहुरी, भोरवाडी,अंबिका नगर, भाळवणी,अहिल्यानगर येथील भक्तांसह पारनेर व नगर तालुक्यातील भाविक भक्त सहभागी झाले होते
या दिंडीला भगवा झेंडा फडकवुन खासदार सुजय दादा विखे यांच्या शुभहस्ते सुरुवात करण्यात आली
दिंडी सकाळी आठ वाजता जखणगांव येथुन व १०वाजता नगरहुन पुढील प्रवासाला निघाली.
अहिल्यानगर येथील सिटी केअर हॉस्पिटलच्या वतीने भाविकांच्या सकाळच्या चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.गाडीच्या प्रवासात साईमंदीर शिर्डी येथुन खास बनवून आणलेली नाश्त्याची पाकिटे सर्वांना वाटण्यात आली.
पुढे दिंडी १ वाजता करमाळा येथील कमलादेवी मंदिरात दर्शनासाठी आली
तेथे महिला भाविकांच्या वतीने कमलाभवानी मातेची साडी चोळी व खणानारळाने ओटी भरण्यात आली
तेथीलच महामुनी मंगल कार्यालयात आलेश्वर निवासी ज्ञानेश्वर कुलकर्णी व दिवाण परिवाराच्या वतीने सर्व भाविकांना दुपारची काल्याची पंगत देण्यात आली.
काल्यासाठी प्रत्येकाने आपल्या सोबत दोनदोन भाकरी आणल्या होत्या.त्या एकत्र करून गोपाळ काला करण्यात आला.काल्यानंतर ह.भ.प.डाँ. शंकरप्रसाद यांचे सुश्राव्य असे प्रवचन झाले. गाढा अभ्यास, समर्पक प्रमाणे, मधुर वाणी व प्रभावी वक्तृत्व यामुळे सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले.
त्यानंतर दिंडी पंढरपुर येथे खेडलेकर मठातील सर्वात मोठ्या पांडुरंगाच्या मुर्तीपाशी थांबली. तेथे हरिपाठ, रिंगण, फुगडी, नृत्य आदी उपक्रमाचा सर्व भाविकांनी आनंद लुटला.
नंतर दिंडीतील वाहने विखे पाटील मठात पार्किंग करून सर्व भाविक भजन म्हणत, हरिनामाचा गजर करत चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचले.
चंद्रभागा नदीत स्नान, पुंडलिकाचे दर्शन, नामदेव पायरीवर माथा ठेवून मंदिर प्रदक्षिणा घालून कळसाचे दर्शन घेत दिंडी पंढरपुर मधील रामबागेत ऊतरलेल्या नागेश्वर दिंडी सोहळ्यात सहभागी झाली.
तेथे दिंडी चालक ह.भ.प. संतोष पारख यांनी दिंडीतील भाविकांचे स्वागत केले. तेथेच ह.भ.प.राऊत महाराज यांचे सुश्राव्य असे किर्तन सर्व दिंडीकरांनी मनोभावे ऐकले. तेथेच किर्तनानंतर भाळवणी, अहिल्यागरच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.एकादशीच्या
रात्री १ वाजता पुन्हा एकदा कळसाचे दर्शन घेऊन दिंडी परतीच्या प्रवासाला निघाली व पहाटे जखणगांवला पोहोचली.

अगोदरच्या दिवशी गायांच्या धारा काढुन आम्ही दिंडीत सामिल झालो व एकादशीच्या दिवशी सर्व उपक्रम राबवून आम्ही पहाटेच गाई म्हशींच्या धारा काढायला गोठ्यात हजर होतो. हे फक्त या एकदिवसीय दिंडीमुळे साध्य झाल्याची भावना ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब कर्डिले यांनी व्यक्त केली.दिंडी यशस्वी करण्यासाठी सरपंच डॉ.सुनिल गंधे यांचेसह गिर्यारोहक श्रीरंग राहिंज,मुकुंद दुबे,मनोज सोनवणे ,रोहन मुरूमकर, मंदा भालेकर,बाळासाहेब शहाणे, सुभाष सौदागर, देवा गंधे, राजेंद्र कर्डिले यांनी विशेष प्रयत्न केले.
ही दिंडी मोफत असुनही उत्कृष्ट नियोजन व मनापासून भक्ती यामुळे चिरस्मरणात राहील अशी भावना दिंडीत सहभागी भाविक व पत्रकार श्रीराम जोशी यांनी व्यक्त केली.

आरोग्य ग्राम जखणगांव येथील एकदिवसीय दिंडीत सर्व भक्तांना ओळखता यावा यासाठी अशी डिजिटल लाईटींग लावलेला झेंडा असल्याने पंढरपुरात तो चांगलाच फेमस झाला.सर्व अधिकारी व पोलीस त्याच्याकडे कुतुहलाने पहातच रहायचे.पण त्यामुळे भक्तांना आपली दिंडी ओळखता आली. एवढ्या गर्दीत कुणीही चुकले नाही किंवा हुकले नाही
शिवाय झेंड्याची लायटिंग वरती,मंदिराचा कळस वरती व पांडुरंग ही वरती त्यामुळे सगळे वारकरी वरतीच पाहात.झेंडा पाहता पाहता सर्वांना पांडुरंगच दिसला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button