इतर

वय विसरून नाशिककर रमले बालपणीच्या खेळांत

नाशिक : गोट्या, आंधळी कोशिंबीर, आबाधोबी, क्रिकेट, फुटबॉल, भवरा, बर्फाचा गोळा अशा बालपणीच्या विविध आठवणी जागविणाऱ्या खेळांत लहान मुलांसोबत सर्व पालकांनीही आपले वय आणि पद विसरून मनमुराद आनंद लुटल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाशिकच्या ट्रीलँड गार्डनमध्ये हा रंगतदार सोहळा काळ पार पडला.

जुने खेळ, संस्कृती, परंपरा आजच्या पिढीला माहित व्हावी, मुलांसोबत पालकांनादेखील आनंद लुटता यावा या उद्देशाने रविवारी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने ‘बालपणीच्या आठवणी’ या विषयाच्या अनुषंगाने आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत, कार्यक्रम समन्वयक शिल्पा पारख, मंथ डायरेक्टर संतोष साबळे, मंथ लीडर धवल दिनानी, राहुल डुंगरवाल यांनी मुले आणि पालकांचे रंगीबेरंगी प्रॉप्स घालून स्वागत केले.   

लहान मुलांना आवडणाऱ्या पेपरमिंट, आस्मंताराच्या गोळ्या, रावळगाव चॉकलेट, रेवडी, बर्फाचे गोळे, गोडीशेव, जेली चॉकलेट, पेप्सीकोलाची मेजवानी देण्यात आली. याचा छोट्यांसह मोठ्यांनीही आस्वाद घेतला. गोदाकाठी निसर्गरम्य सायंकाळच्या हवेशीर आल्हाददायक वातावरणात क्रिकेट, गोट्या, आंधळी कोशिंबीर, आबाधोबी, फुटबॉल अशा निरनिराळ्या खेळांचा सर्वांनीच मनमुराद आनंद लुटला. यानंतर डीजेच्या तालावर सर्वांनीच ठेका घेतला आणि हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. बालगोपाळांसह पालकांनीही सुटीचा चांगलाच आस्वाद घेतला. अनेक पाल्यांनी अनेक खेळ तब्बल २० ते ४० वर्षांनी खेळले.

दिवसेंदिवस काळ बदलत चालला असला तरीही आपल्या कुटुंबाबरोबरच मित्रपरिवारासोबत बालपणीच्या खेळांचा आनंद घेणे काळाची गरज आहे. मानसिक ताणताणाव दूर होण्याबरोबरच स्नेहीजनांशी संवाद, मैत्री आणि प्रेम या उपक्रमातून वाढीस लागला. रोटरीचे ज्येष्ठ सदस्य तथा ट्रीलँड प्रकल्पाचे संचालक डी. जे. हंसवाणी, रवी महादेवकर, डॉ. राजेंद्र नेहेते, आबासाहेब काळे, राज तलरेजा, विजय दिनानी, दमयंती बरडिया, मंगेश अपशंकर, अरुण वाघमारे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.       

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button