धार्मिक

विजया दशमी ( दसरा ) भारतीय हिंदू धर्मसंस्कृतीत साडेतीन मुहूर्तापैकी एक मांगल्यमयी महत्वाचा मुहूर्त


🚩🚩🚩


प्राचीनकाळापासून भारतीय हिंदू परंपरेत वैदिक , अध्यात्मिक , वैज्ञानिक संस्कृतीप्रधान , संस्कारी व्रतवैकल्ये , प्रथा , सणउत्सव अत्यन्त श्रद्धेने , उत्साहाने साजरी करण्याची परंपरा आहे. हिंदुधर्मामध्ये भारतातील प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे अगदी चैत्र महिन्यापासून फाल्गुन पर्यंत म्हणजे बारा महिने असे उत्सव श्रद्धेने साजरे केले जातात. तीच उत्सवी परंपरा मी म्हटल्या प्रमाणे चैत्र महिन्यापासून अगदी फाल्गुन महिन्यापर्यंत असे अनेक पारंपरिक सण उत्सव साजरी करण्याची प्रथा अनादीकालापासून आहे.

त्या प्रत्येक सणाला मानवी संस्कृतीच्या नैतिक जीवनमूल्यांची अर्थपुर्ण अशी अध्यात्मिक , वैचारिक , वैज्ञानिक कल्याणकारी अभ्यासात्मक बैठक आहे. प्रत्येक सणाचे एक संस्कारांचे , संस्कृतीचे वैशिष्टय आहे. हे सर्वश्रुत आहे. मी नेहमी या बाबत माझ्या व्याख्यानातून किंवा बोलण्यातून भारतीय सण आणि सांस्कृतिक उत्सव या विषयावर सारांशात्मक वैयक्तिक विचार मांडले आहेत.

शालिवाहन शके १९४५ – ४६ विक्रम संवत २०७९ आणि शिवशक ३४९ या चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून आजर्यंत अगदी या नवरात्रीनंतर अत्यन्त उत्साहाने साजरा होणाऱ्या विजया दशमी म्हणजेच ( दसरा ) अश्विन शुद्ध १० या विजयोत्सवा उत्सवाबद्दल आज लिहीत आहे.

अश्विन शुद्ध दशमीला विजया दशमी ( दसरा ) म्हटले जाते.
विजया दशमी हा भारतीय हिंदू धर्मसंस्कृतीत साडेतीनमुहूर्तापैकी एक मांगल्यमयी असा महत्वाचा मुहूर्त समजला जातो आणि तो अत्यन्त आनंदाने साजरा केला जातो.

जे आनंददायी , मंगलमय , सात्विक , कृपाळू , कृपावंती , चिरंतन , श्रद्ध्येय आहे , ते ते अगदी उत्साहाने करण्याची प्रथा प्रत्येक कुटुंबात आहे.
तसे पाहिले तर प्रत्येक सणाबद्दल विशिष्ठ अध्यात्मिक , सांस्कृतिक ,अशा आत्ममुख करणाऱ्या संकल्पना आहेत त्याचप्रमाणे दसरा सणाबद्दल देखील अनेक पौराणीक कथा आहेत. महालक्ष्मी देवीने पुराणात महिषासुर राक्षसाचा वध केल्याबद्दल विजयोत्सव म्हणून दसरा साजरा केला जातो तर रामायणात प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला म्हणून दसरा हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे तर महाभारतात पांडवांचा जेंव्हा अज्ञातवास संपला म्हणून त्याच दिवशी शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली / लपलेली जी शस्त्रे होती ती त्यांनी बाहेर काढली आणि शमी वृक्षाचे पूजन केले तो दिवस देखील *विजया दशमीचाच होता असे मानले जाते.
नवरात्रातील या नऊ दिवस पौराणिक कथा मध्ये महिषासुर राक्षसाने पृथ्वीवर अराजकता माजविली होती म्हणून या देवीने , महालक्ष्मीने म्हणजेच महिषासुर मर्दिनीने अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत अखंडित युद्ध करून महिषासुराचा वध केला आहे म्हणून *चैत्रशुद्ध नवमीला (खंडेनवमी ) नवव्या दिवशी या नवरात्र उत्सवाची आपापल्या प्रथेप्रमाणे सांगता होते.*
आणि त्या नंतर आनंदाने दुसरे दिवशी सीमोल्लंघन करून दशमीला म्हणजे विजया दशमीला आपट्याच्या झाडांची पाने सोने समजून वाटण्याची ही परंपरा आजही सुरू आहे.

त्यामुळे आनंदाची उधळण , पराक्रमाचे आणि पौरुषत्वाचे दृष्टांती ऐतिहासिक प्रसंग या सर्व घटनांचा इतिहास या भारतीय सणउत्सवांच्या परंपरेत आपल्याला दिसून येतो हे मात्र खरे..!
म्हणूनच
दसरा सण मोठा , नाही आनंदाला तोटा
असे म्हणण्याचा प्रघात आहे.
हा विजयोत्सव भारतात उत्तरप्रदेश , कलकत्ता , गुजरात ,आसाम ,महाराष्ट्र , बिहार एवढेच नाही तर पाश्च्यात्य देशात जिथे भारतीय हिंदू आहेत अशा ठिकाणी देखील हे असे धार्मिक उत्सव साजरे केले जात आहेत.

उत्तर भारतात या दिवशी रामलीलेचा रामायणाच्या चरित्रातील देखावे , नाट्य , उत्साहाने साजरा करून मिरवणूकी काढल्या जातात. अनेक ठिकाणी परंपरेप्रमाणे रावण , मेघनाथ कुंभकर्ण यांचे पुतळे करून त्या दुष्ट प्रवृत्तींचे मिरवणूक काढून दहन केले जाते तसेच घरातील पोथ्यांचे , हत्याऱ्यांचे , पारंपारिक राजचिन्हानचे पूजन केले जाते.
त्यावेळी
अशमन्ततक महावृक्ष महादोष निवारणम ।
इष्टांनाम दर्शनम देहि कुरु शत्रुविनाशनम,।
हा मंत्र म्हणून दसऱ्याचा विजयोत्सव साजरा केला जातो.*
सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते.
आपल्या व्यवसायाची साग्रसंगीत हारफुले माळून पूजा केली जाते. मुहूर्तावर नवनवीन वस्तू कपडे , सोने , चांदी अशा अनेक वस्तू खरेदी केल्या जातात. समाजात एकमेकांना भेटून सीमोल्लंघन करण्याची आणि सोने वाटण्याची प्रथा आहे.
इती लेखन सीमा……


©️वि.ग.सातपुते.
संस्थापक अध्यक्ष:-
महाकवी कालिदास प्रतिष्ठान
पुणे,मुंबई, ठाणे, मराठवाडा (महाराष्ट्र)
📞(9766544908)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button