इतर

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

अहिल्यानगर, दि. २८ – पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी तसेच उत्पादनांचे काढणीनंतरचे व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे या उद्देशाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०२४-२५ या वर्षासाठी मनुष्यबळ विकास घटकांतर्गत संस्थानिहाय शेतकरी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ३ ते ५ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास प्रति दिन एक हजार रूपये देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमांतर्गत शेतकरी, क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिकांचे आयोजन तसेच, यशस्वी व प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या जातात. राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था, एनआयपीएचटी, तळेगाव दाभाडे या संस्थेमार्फत ठाणे, पुणे, कोल्हापूर व अमरावती विभाग येथे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

         बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF) नाशिकचे आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, नागपूर येथील वरोरा, दापोली येथील हापूस आंबा गुणवत्ता केंद्र,  पुणे येथील राहूरी डाळिंब गुणवत्ता केंद्र,  छत्रपती संभाजीनगर येथील केशर आंबा गुणवत्ता केंद्र, नागपूर येथील संत्रा गुणवत्ता केंद्र येथे  प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

          फळे व भाजीपाला रोपवाटीका, कृषी व्यापाराबाबत धोरण व निर्यातीबाबत माहिती, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन (आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी), ड्रॅगन फ्रुट व जिरेंनियम व नाविण्यपूर्ण पिकांचे उत्पादनाचे तंत्रज्ञान, औषधी, सुगंधी व मसाला पिकांचे उत्पादन, प्रक्रिया व विपणन, हरितगृह, पॉली हाऊस व्यवस्थापन,  हॉर्टीकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स, काढणीपश्चात व्यवस्थापन (फळे व भाजीपाला), पीकनिहाय लागवड व प्रक्रिया (डाळींब, हळद व आले), या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

         शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमात साहित्य, चहा पान, भोजन व निवास व्यवस्था आदी सुविधा करण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी प्रशिक्षणासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या संस्थांना किंवा अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

          पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था, एनआयपीएचटी संस्था ( विश्वास जाणव, ०२११- ४२२३९८०/९४२३०८५८९४), कृषी विज्ञान केंद्र, बारामती जि.पुणे (श्री. यशवंतराव जगदाळे, ०२११- २२५५२२७/९६२३३८४२८७), राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF), चितगाव फाटा, दारणा. ता. निफाड, जि. नाशिक, (डॉ. पी. के. गुप्ता – ९४२२४९७७६४), आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय वरोरा, जि. चंद्रपूर (डॉ. अनिल भोगावे – ९५७९३१३१७९), हापूस आंबा गुणवत्ता केंद्र, दापोली (डॉ. महेश कुलकर्णी – ८२७५३९२३१५),  डाळिंब गुणवत्ता केंद्र, राहुरी (डॉ. सुभाष गायकवाड ९८२२३१६१०९), केशर आंबा गुणवत्ता केंद्र, छत्रपती  संभाजीनगर (डॉ. जी. एम. वाघमारे – ७५८८५३७६९६), संत्रा गुणवत्ता केंद्र, नागपूर (डॉ. विनोद राऊत – ९९७००७०९४६) यांना संपर्क साधण्याचे आवाहन श्री.बोराळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button