लायन्स क्लब पुणे फ्युचर यांच्या वतीने देवराई निर्मितीचा श्रीगणेशा.
अकोले/प्रतिनिधी –
निसर्ग जतन संवर्धनाचा एक भाग म्हणून राजूर येथील ॲड.एन.एम.देशमुख महाविद्यालयात दोनशे स्थानिक वृक्षांची लागवड करीत देवराई फाऊंडेशन, लायन्स क्लब पुणे फ्युचर (प्रांत ३२३४ डी २) यांच्या वतीने अकोले तालुक्यातील नवीन देवराई निर्मितीचा श्रीगणेशा करण्यात आला.जिल्ह्यात अशा प्रकारे देवराई निर्मितीचा जिल्ह्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रयोग आहे.
काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड झाली आणि जंगलातील वृक्षांची संख्याही कमी झाली.यात काही देवरायांचे संवर्धन आदिवासी भागाने जपले आहे.
वृक्ष तोडीचा फटका मानव जाती बरोबरच पक्षी आणि पिकांनाही बसल्याचे दिसून येत आहे.
कमी होत असलेले वृक्ष राज पुन्हा बहरावे यासाठी लायन्स क्लब पुणे फ्युचर आणि थेवूर येथील देवराई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यनिकेतन संस्थेच्या देशमुख महाविद्यालयात सदर देवराई उभारण्यात आली आहे.
संस्थेच्या राजूर येथील गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्यालय, कातळापूर येथील नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विद्या मंदिर, खिरविरे येथील सर्वोदय विद्यालय आणि शेणित येथील डॉ. राजेंद्र प्रसाद आश्रमशाळा या ठिकाणी प्रत्येकी ५० वृक्षांचे लायन्स वृक्ष ग्रंथालय उभारण्यात आले आहे.
या सर्वच ठिकाणी कुसुंब,कौशी, दालमाया,शेंदरी, काळा पळस,मोई,रोहितुक,सुरभी,उंडी आदी दुर्मीळ वनस्पती तर अग्निमंथ,अर्जुन,मुचकुंद, शिवण, बाहवा,अडुळसा,पुत्रंजिवा,गुळवेल,अडुळसा आदी औषधी वनस्पती या बरोबर रामफळ,आंबुळकी,भोकर, शिंदी, करवंद,गावठी आंबा अशी फळझाडे आणि रानजय,जुई,गुंजवेल,मायाळू,कृष्ण कमळ,रान जय, रातराणी आदी वेलवर्गीय व गवती चहा,मेहंदी, बाळा अशा गवत वर्गीय झाडांचा यात समावेश आहे.विशेष म्हणजे या प्रत्येक झाडाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी प्रत्येक झाडाची विस्तृत माहिती देणारे फलक लावण्यात आले आहे.यामुळे विदयार्थ्याना या वृक्ष संपदेची माहिती व ओळख होणार असल्याचे देवराई फाऊंडेशनचे रघुनाथ ढोले तसेच लायन्स क्लबचे प्रांत सचिव अशोक मिस्त्री यांनी सांगितले. देवराई वृक्ष लागवड करताना देवराई फाऊंडेशनचे ढोले,लायन्स प्रांत सचिव मिस्त्री,वृक्षमित्र रमाकांत डेरे,संस्थेचे संचालक मिलिंदशेठ उमराणी, एस.टी.येलमामे,प्रकाश टाकळकर,विजय पवार,प्रकाश महाले, प्राचार्य भाऊसाहेब बनकर,बादशहा ताजणे,ज्ञानेश्वर आरोटे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी,प्रा.वाल्मिक गिते,मनोहर भांगरे,प्रा.अवसरकर,प्रा. टपले आदी उपस्थित होते.
– मागील चार वर्षांचे स्वप्न पुर्ण झाले.राजूर परिसरात एखादी देवराई व्हावी अशी खुणगाठ आपण मनाशी चार वर्षापूर्वी बांधली होती.आज अखेर ती देवराई उभी राहिली याचा मनस्वी आनंद होत आहे._ प्रांत सचिव अशोक मिस्त्री.