राज्यातील 20 हजार बारवांचे पुनरुज्जीवन, संवर्धनासाठी समिती ची स्थापना
मुंबई-जलसंवर्धनासोबत स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या राज्यातल्या किमान वीस हजार ऐतिहासिक व प्राचीन बारवांना गतवैभव प्राप्त होणार आहे. राज्य सरकारने या बारवांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्राचीन संस्कृतीचा पुरातन ठेवा पुढे येईलच, पण पर्यटनालाही मोठी चालना मिळण्यास मदत होईल.
राज्यात सातवाहन काळापासून बारवांची निर्मिती झाल्याची नोंद आहेत. राज्यात सुमारे वीस हजार ऐतिहासिक बारव आहेत. पण सध्या अनेक बारव ढासळले आणि बुजले आहेत. या बारवांचा उपयोग पाण्याचा स्रोत म्हणून होत नाही. त्यामुळे या बारवांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत बारवांच्या संवर्धनासाठी 22 तज्ञांची समिती स्थापन केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पहिल्या टप्प्यात राज्यातील 75 बारव जतन व संवर्धनाचे आराखडे तयार करण्यात येतील.
-कमानी आणि खोल्या-
अत्यंत सुबक दगडी बांधकामामध्ये तयार केलेल्या बारवमध्ये कमानी, देवळ्या आहेत. काही बारवमध्ये विश्रांतीसाठी खोल्याही आहेत. त्यात अत्यंत थंडगार वाटते. काही बारव वर्तुळाकार, आयताकृती, चौकोनी, वर्तुळाकार, षटकोनी, अष्टकोनी आहेत.
कचराकुंड्यांचे स्वरूप-
अनेक बारवांमध्ये अजूनही बारा महिने पाणी आहे. पण हल्लीच्या काळात बारव दुर्लक्षित झाले आहेत. प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या बारवांना कचराकुंड्यांचे स्वरूप आले आहे. निर्माल्य, प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कचरा बारवांमध्ये फेकण्यात येतो. पण अनेक गावातील तरुणांनी बारव स्वच्छतेची संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे.
बारव म्हणजे काय…
बारव म्हणजे पायऱ्या असलेली विहीर. पाण्याचा साठा करण्यासाठी प्राचीन काळापासून देशासह महाराष्ट्रात बारव अस्तित्वात आहेत. बारव स्थापत्यशास्त्राचा अतिशय उत्तम नमुना मानले जातात. गुजरातमध्ये ‘रानी की बावडी’ म्हणून जगप्रसिद्ध बारव आहे. पण महाराष्ट्रातही त्याच तोडीचे असंख्य बारव आहेत. गुजरात व राजस्थानमधील बारवांपेक्षा राज्यातील बारवांची संख्या अधिक होती असे सांगण्यात येते. राज्यात यादव, शिवकालीन, पेशवेकालीन, होळकर अशा वेगवेगळ्या राजवटींमध्ये बारव बांधले आहेत. मराठा राजवटीत पश्चिम महाराष्ट्रात अनेक बारव बांधले. त्यातील काही शिवपिंडीच्या आकारातील आहेत. अहिल्याबाई होळकर यांनी उत्तर महाराष्ट्रात बारव बांधल्याची नोंद आहे. कोकणात चिऱ्याच्या दगडात बांधण्यात आलेल्या बारव या ‘घोडबाव’ म्हणून ओळखल्या जातात.