धोत्रे येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम निकृष्ट ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील मौजे धोत्रे बुद्रुक येथे राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम निकृष्ट झाल्याने ग्रामस्थांना आजही पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. नुकतेच सुरु झालेले जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचे काम शासनाच्या प्लॅन, इस्टीमेट नुसार करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
पारनेर तालुक्यातील मौजे धोत्रे बुद्रुक येथे यापूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेचे 2 कोटी 14 लाख रुपये खर्च करुन राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम झाले आहे. सदरील काम अतिशय दर्जाहीन झाले असून, आजही वाडी-वस्ती या योजनेच्या पाणीपासून वंचित आहेत.
परंतु सद्यस्थिती चालू असलेले जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेने तरी पाणी धोत्रे ग्रामस्थांना मिळावे, अशी धोत्रे ग्रामस्थांची अपेक्षा आहे. अनेक वर्षापासून हा भाग दुष्काळी राहिला असून, उन्हाळ्यात गावातील महिला व मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही अधिकार्यांचे अर्थपूर्ण संबंधामुळे पारनेर तालुक्यातील अनेक योजना निकृष्ट झाल्या व काही बंद पडल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत धोत्रे गावाला पाणी मिळण्यासाठी शासनाच्या प्लॅन, इस्टीमेट नुसार कामे व्हावे. तसे न झाल्यास कार्यकारी अभियंता, इंजिनिअर व ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.