अहमदनगरइतर

आमदार लंके यांचे उपोषण सुरू होताच बंधाऱ्यांची निविदा प्रक्रिया

दत्ता ठुबे

पारनेर : प्रतिनिधी

पारनेर-नगर मतदारसंघातील ३० बंधाऱ्यांच्या कामांवरील स्थगिती उठविल्यानंतरही या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात टाळाटाळ करणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या पुणे येथील कार्यालयासमोर आ. नीलेश लंके यांनी सोमवारी उपोषण सुरू करताच सायंकाळी सर्व कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी आश्‍वासन मृद व जलसंधारण विभाागाचे अप्पर आयुक्त जलसंधारण तथा मुख्य अभियंता सुनील कुशेरे यांनी दिले. मंगळवारी या कामांच्या निविदा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. पारनेर तालुक्यातील २१ तर नगर तालुक्यातील ९ बंधाऱ्यांच्या कामांना महाविकास आघाडीच्या काळात ९ व ११ मे रोजी प्रशासकिय मान्यता देण्यात आली होती. एकूण २९ कोटी १९ लाख रूपये खर्चाच्या या कामांना राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ८ जुलै रोजी स्थगिती देण्यात आली होती. आ. नीलेश लंके यांनी पाठपुरावा करून दि.२५ ऑक्टोबर रोजी ही स्थगिती उठविली. त्याचवेळी जिल्हयातील इतर तालुक्याच्या बंधाऱ्यांच्या कामांची स्थगितीही उठविण्यात आली होती. इतर तालुक्यांतील कामांची निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन ही कामे पुर्णही झाली. पारनेर तालुक्यातील कामांची निविदा प्रक्रिया मात्र रोखण्यात आली होती. आ. नीलेश लंके यांनी त्याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही स्थगिती उठविण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. या स्थगितीमागे राजकारण असल्याचा आरोप करण्यात येऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या कामांमध्ये खोडा घातल्याचेही सांगण्यात येत होते. वारंवार पाठपुरावा करूनही निविदा प्रकिया राबविली जात नसल्याने आ. लंके यांनी दि.१७ मार्च रोजी निविदा प्रक्रिया राबविण्याच्या मागणीसाठी पुणे येथील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तसे पत्रही संबंधित कार्यालयास देण्यात आलेे होते. आ. लंके यांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर मात्र मृद व जलसंधारण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची फोनाफोनी सुरू झाली. निविदा प्रक्रिया राबवू, आंदोलन करू नका अशी मनधरणीही करण्यात येत होती. मात्र आ. लंके यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. सोमवार दि.२७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आ. लंके यांनी मृद व जलसंधारण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. मतदारसंघातील शेकडोे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अप्पर आयुक्त जलसंधारण तथा मुख्य अभियंता सुनील कुशेरे यांनी आ. लंके यांची भेट घेऊन कामांची निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी दर्शविली. मात्र तात्काळ निविदा प्रक्रिया राबवा व तसे लेखी आश्‍वासन द्या अशी भूमिका आ. लंके यांनी घेतल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुनील कुशेरे यांनी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आल्याचे व मंगळवारी हे ऑनलाईन टेंडर सार्वजनिक होतील असे आश्‍वासन दिलीे. त्यानंतर लिंबू पाणी घेऊन आ. लंके यांचे उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणास वडगांवशेरीचे आमदार सुनील टिंगरे, अशोक सावंत, बाबाजी तरटे, नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष अर्जुन भालेकर, चंद्रकांत चेडे, कारभारी पोटघन, अभयसिंह नांगरे,जितेश सरडे, सतीश भालेकर, सुदाम पवार, किसनराव रासकर, ठकाराम लंके,वसंत कवाद,बबलू रोहोकले, बाळासाहेब लंके, डॉ. बाळासाहेब कावरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

अजित पवार यांच्याशी चर्चा

आ. लंके यांना लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आ. लंके यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधला. पवार यांनी सविस्तर माहीती घेतल्यानंतर त्यांनी मुख्य अभियंता सुनील कुशेरे यांच्याशीही चर्चा करीत ही सर्व कामे उन्हाळयापूर्वीच करण्याचे निर्देश पवार यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button