लाच स्वीकारताना पुण्यातील पोलीस अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे दि२४
गुन्ह्यातील गाडी परत करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागून 8 हजार रुपये लाच स्वीकारताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील मंचर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि.23) मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट जवळ असलेल्या सिद्धी हॉस्पिटल समोरील रोडवर केली.
सहायक पोलीस निरीक्षक संतोष सुरेश साळुंखे (वय 44), पोलीस शिपाई संदीप भीमा रावते (वय -36) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहे. याबाबत 24 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली आहे. तक्रारदार यांची अपघाताच्या गुन्ह्यातील दुचाकी परत देण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी एपीआय संतोष साळुंखे व पोलीस शिपाई संदीप रावते यांनी 40 हजार रुपयांची लाच मागितली. पोलिसांकडून लाचेची मागणी होत असले बाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबी कडे तक्रार केली.
प्राप्त तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पुणे एसीबीच्या पथकाने शनिवारी पडताळणी केली. पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचे काम करून देण्यासाठी तडजोड़ी अंती दोन्ही आरोपींनी 8 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट जवळ असलेल्या सिद्धी हॉस्पिटल समोरील रोडवर सापळा रचला. पोलीस शिपाई संदीप रावते यांना तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांना अटक केली. दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे
अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण महिला पोलीस हवालदार सरिता वेताळ, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, चालक पोलीस हवालदार कदम यांच्या पथकाने केली.