नागपूर आंदोलनात कंत्राटी वीज कांमगाराचा मृत्यू!

नागपूर–
महावितरण नागपूर येथील वीज कंत्राटी कामगार संघाचे सदस्य स्वर्गीय राजबहादुर रामगोपाल यादव हे नागपूर महावितरण शाखा गोविंदभवन येथे लाईनमन या पदावर कंत्राटी पद्धतीने मागील 15 वर्षापासून कार्यरत होते. बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी ते नागपूर येथील संयुक्त कृती समितीच्या आंदोलनात सहभागी होते. आंदोलना दरम्यान त्यांना नागपूरच्या तीव्र उन्हाचा त्रास झाल्याने त्यांना 28 तारखेला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचार चालू असताना काल गुरुवारी दिनांक 29 फेब्रुवारी रोजी त्यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
7 फेब्रुवारी 2024 रोजी कृती समितीने महाराष्ट्र शासन व तिन्ही वीज कंपनी प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 9 फेब्रुवारी रोजी प्रधान सचिव ऊर्जा यांना पत्र देऊन कृती समितीची मिटिंग लावण्याची विनंती केली. कायम कामगारांच्या संघटनांनी देखील मिटिंग लवकर लावण्याची विनंती केली मात्र या सर्व विनंत्या कडे महाराष्ट्र शासन आणि वीज कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे या आंदोलनातील एका कामगाराचा बळी गेल्याची भावना कामगार वर्गात झाल्याने त्यांच्यात प्रशासना विरोधात संतापाची तीव्र लाट निर्माण झाली आहे.
या कामगाराच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत करावी व त्या कामगारांच्या वारसाला वीज कंपनीत नोकरी द्यावी असे राज्य संघटक सचिन मेंगाळे म्हणाले
भारतीय मजदूर संघाच्या कंत्राटी कामगार वेलफेअर फंडातून 11 हजार रुपयांचा निधी कुटुंबाला दिला जाईल असे संघटनेचे कोशाध्यक्ष सागर पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन अथवा तिन्ही वीज कंपनी प्रशासनाने आंदोलनाची अद्याप दखल न घेतल्यामुळे 5 मार्च 2024 च्या मध्यरात्री पासून होणारे बेमुदत आंदोलन अटळ आहे असे निमंत्रक रोशन गोस्वामी यांनी सांगितले.