इतर

न्याहळोद, ता. धुळे येथे शहीद जवान मनोहर पाटील यांना हजारो नागरिकांनी दिला अखेरचा निरोप .

धुळे, दि. 7 : अमर रहे…, अमर रहे… शहीद जवान मनोहर पाटील… अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी न्याहळोद, ता. धुळे येथे पांझरा नदीच्या काठावर शहीद जवान मनोहर पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.

ऑपरेशन मेघदूत अंतर्गत सियाचीन ग्लेशियर येथे कार्यरत हवालदार मनोहर रामचंद्र पाटील यांना 16 जुलै 2022 रोजी तीव्र डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सैन्य दलाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचा 5 सप्टेंबर 2022 रोजी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव आज सकाळी न्याहळोद येथे आणण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून ‘अमर रहे…, अमर रहे…शहीद जवान मनोहर पाटील..अमर रहे’सह भारत माता की जय, वंदेमातरमच्या घोषणा देत होते.

हवालदार मनोहर पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर खासदार डॉ. सुभाष भामरे, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), तहसीलदार गायत्री सैंदाणे (धुळे ग्रामीण), सैन्य दलातर्फे कॅ. प्रतिक चिटणीस, संजयकुमार, सोनगीर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील, सैनिक कल्याण संघटक रामदास पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलिस दल आणि सैन्य दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. माजी सैनिकांनीही शहीद जवान मनोहर पाटील यांना अभिवादन केले.

शहीद मनोहर पाटील यांची 11 वर्षीय कन्या तनिष्का हिने वडिलांना मुखाग्नी दिला. तिने मनोगत व्यक्त करताना सांगितले, ‘देशाच्या सीमांची सुरक्षा करताना माझे वडील शहीद झाले. त्यांचा मला अभिमान आणि गर्वही आहे. कन्या म्हणून मी त्यांचे भूषण होते’. त्याबद्दल ते नेहमी बोलत असत.

खासदार डॉ. भामरे यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी सांगितले, शहीद जवान मनोहर पाटील यांचे कार्य अतुलनीय होते. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. न्याहळोद येथे त्यांच्या स्मारकासाठी खासदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, संजीवनी शिसोदे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे आदींनी शहीद जवान मनोहर पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.  यावेळी सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button