क्रांतिकारकांच्या इतिहासाला उजाळा देत.विदयार्थ्यांशी साधला संवाद

अकोले/प्रतिनिधी –
कोणताही इतिहास हा गौरवशाली असतो.स्फूर्तीदायी असतो.इतिहासाच्या पानापानांत अस्तित्वाच्या संघर्षाची कहानी असते. न्याय हक्कासाठी उठाव केल्याच्या क्रांतिकार्याच्या शौर्यगाथांचे वर्णन असते.नव समाज निर्मितीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याच्या खाणाखूणा बघायला मिळतात. क्रांतिकारकांच्या जीवन कार्यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळते.तेच आपले आदर्श असतात .
अशाच क्रांतीच्या गौरवशाली कार्याने इतिहासात अमर झालेल्या स्थानिक क्रांतिकारकाचा अकोले तालुक्यातील राजूर प्रांतात बंडाची ठिणगी पेटवून इंग्रजी राजवटीला आवाहन देण्याचे धाडस करून ते पूर्णत्वास नेणाऱ्या महान क्रांतिकारकाचा इतिहास जि.प. प्राथ.शाळा वाकी येथील विदयार्थ्यांनी एका कलाकारकाच्या कला सादरीकरणातून अनुभवला.
बाडगीची माचीच्या पायथ्याशी महाकाळ डोंगररांगाच्या सानिध्यात अमृतवाहिनीच्या खोऱ्यात देवगाव ता . अकोले ही जन्मभूमी असलेले आदय क्रांतिकारक राघोजी भांगरे.त्याच क्रांतिच्या भूमित जन्मलेले कलाकार कारभारी भांगरे उर्फ प्रति राघोजी.राघोजी भांगरे यांचे जेष्ठ मार्गदर्शक सल्लागार देवजी आव्हाड यांची भूमिका साकारणारे कलाकार बाळू भांगरे.या कलाकारांना उपाध्यापक अर्जुन तळपाडे यांच्या माध्यमातून शाळेत बोलावून क्रांतिकार्याचा इतिहास जिवंत साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला .
राजूर प्रांताचे नाईक सुभेदार रामजी भांगरे,रतनगडाचा ढाण्या वाघ गोविंदराव खाडे,कृष्णा खाडे , वीरांगणा रूख्मिणी खाडे यांच्या पासून आदय क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या संघर्षमय क्रांतिकार्याचा ओझरता इतिहास कारभारी भांगरे यांनी विदयार्थ्यांसमोर उलगडून दाखवला.आजच्या स्वातंत्र्याच्या पर्वात विदयार्थ्यांना हातात शस्त्र घेऊन लढण्याची आवश्यकता नसून हातात लेखणी घेऊन आपल्या क्रांतिवीरांना स्मरण करुन त्यांची स्फूर्ती जपत पुढे मार्गक्रमण करत आदर्शवत जीवन जगण्याची गरज असल्याचेही त्यांनी विदयार्थ्यांशी संवाद सादताना इच्छा व्यक्त केली.आपल्या समोर थोर हुतात्म्यांचा आदर्श ठेवून समाजासाठी आपल्या भारत देशासाठी भविष्य घडविण्याचे आवाहन या मार्गदर्शक कलाकांरांनी केले.आपल्या समोर प्रत्यक्ष राघोजी भांगरे यांची जीवंत कलाकृती अनुभवतांना विदयार्थी आपल्या परिसरातील प्रेरणादायी इतिहासात हरवून गेले.सह्याद्रीच्या या कणखर डोंगररांगांना शौर्याची परंपरा आहे.शुरविरांच्या कार्यकर्तृत्वाने आपला परिसर प्रसिद्ध आहे याचा सर्वांना अभिमान वाटला.परिसर डोंगररांगांचा असला तरीही तो गौरवशाली क्रांतिशौर्यांचे गीत गातो आहे.क्रांतिवीरांचा खणखर आधार आहे.हे ऐकूण सर्वच भारावून गेले.आपोआपच विदयार्थ्यांच्या तोंडून क्रांतिवीर राघोजी भांगरे की जय !हर हर महादेव !छत्रपती शिवाजी महाराज की जय ! भारत माता की जय !च्या घोषणांनी संपूर्ण शालेय परिसर क्रांतिमय झाला .
यावेळी मेजर विठ्ठल बांगर,धिरेंद्र सगभोर,विश्वनाथ सगभोर,संदिप सगभोर,श्रीकांत सगभोर,चंद्रकांत सगभोर,रोहिणी भोईर,सखूबाई वाघमारे आदि बांधव उपस्थित होते . शाळेच्या उपाध्यापिका यशोदा ढगे यांनी मार्गदर्शक कलाकारांचे आभार व्यक्त करत शालेय विदयार्थी आपल्या शिकण्यात स्थानिक इतिहास नक्कीच अभ्यासतील व सर्वांच्या सहकार्याने शाळेतही शिक्षक इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी करतील असा विश्वास व्यक्त केला .