नवरात्रोत्सवात श्री मळगंगा मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी .

दत्ता ठुबे
पारनेर – नवसाला पावणारी म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेली निघोज श्री मळगंगा मातेच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्य भरातून भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने निघोज नगरी दुमदुमून गेली आहे .
या नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दररोज श्री मळगंगा मातेची पहाटे महापूजा , तदनंतर सकाळी ६ वाजता महाआरती व दिवसभर दर्शन घेण्यासाठी राज्य भरातून आलेल्या भाविक भक्तांच्या महागर्दीने निघोज नगरी अक्षरशः फुलून गेल्याने येथील व्यावसायिकांच्या पदरी ४ पैश्यांची भर पडून त्यांचे व्यवसाय जोमाने सुरू आहे , त्यामुळे निघोज मधील व्यावसायिक ही आनंदी आहेत .
श्री मळगंगा मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या भाविक भक्तांना दर्शन घेण्यासाठी कोणती ही अडचण येऊ म्हणून श्री मळगंगा देवस्थान ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी अक्षरशः जातीने हजर राहून नियोजन करताना दिसून येत आहे . दररोज रात्री ७ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते महाआरती घेण्यात येते , यावेळी अक्षरशः मंदीर गर्दीने खचाखच भरलेले असते . जागा नसल्याने भाविक भक्त मंदीरा बाहेर रस्त्यावर उभे राहून महाआरती त तल्लीन होवून सहभागी होतात . या गर्दीत काही गैरप्रकार होवू नये , म्हणून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखालील निघोज दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी व राज्य गृह रक्षक दलाचे जवान ही डोळ्यात तेल घालून लक्ष देवून असल्याने अदयाप पर्यंत कोणतीही चोरी वा गैरप्रकार घडला नाही .
या नवरात्रोत्सवाच्या वेळी निघोज मधील श्री मळगंगा माता मंदीर व जगभरात रांजण खळग्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुंडावरील कुंडाई माता मंदीरावर आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई करण्यात आल्याने परिसर चमकून निघत असल्याने सायंकाळ नंतर डोळ्यांचे पारणे फिटले जातात .
नवरात्रीच्या १ ल्या माळेपासून श्री मळगंगा माता व कुंडावरील कुंडाई मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक भक्तांनी मोठ्या श्रध्दा व भक्ती पोटी निघोज नगरी ला मोठ्या संख्येने दुचाकी , चार चाकी वा इतर साधनांनी भेट देताना दिसून येत आहे . यात छोट्या मुलांपासून तरुण , वृद्ध महिला व पुरुषांचा समावेश आहे . श्री मळगंगा देवस्थान ट्रस्ट बरोबरच ग्रामपंचायत , विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था , गावातील विविध तरुण मंडळे व सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी , कर्मचारी व स्वयंसेवक हे ही राबताना दिसून येत आहे .