इतर

कमी शिकलेला पण सर्वाधिक सुशिक्षित आणि शहाणा माणूस.

.

महाराष्ट्र वसंतदादांना विसरू शकत नाही.यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दादांएवढा मोठा माणूस महाराष्ट्रात नाही. दादा न शिकलेले. पण शिकलेला दादांच्या पुढे फिका पडे, इतके दादांचे चौरस ज्ञान होते आणि सामान्य माणसाशी जुळलेली नाळ. त्यामुळे दादा सर्वाथाने ‘दादा’ होते.

स्वातंत्र्याच्या चळवळीत पत्री सरकारात दादा होते. क्रांतिसिंह नाना पाटील, नाथा लाड, बापू लाड, नागनाथ नायकवडी, पांडू मास्तर असे सगळे क्रांतिकारी सातारा जिल्हा घुसळून काढत होते. तेव्हा सांगली जिल्हा झाला नव्हता. दादांना पकडायला बक्षीस होते. दादा पकडले गेले. पण मिरजेच्या तुरुंगातून दादा तुरुंग फोडून सटकले. तटावरून उड-या मारल्या. पोलिसांनी गोळीबार केला. दादांचे साथीदार पांडू मास्तर गोळीबारात बळी पडले.

दादांच्या पाठीत उजव्या बाजूने गोळी घुसली. शस्त्रक्रिया करून ती काढण्यात आली. दादा अनेक वर्षे सांगत असत, ‘स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळ-या झेलणारे अनेक आहेत. मी पाठीवर गोळी झेलली आहे.’ दादांच्या पाठीवर आणि छातीवर दोन्ही बाजूला शस्त्रक्रियेच्या खुणा शेवटपर्यंत होत्या. दादांनी स्वातंत्र्यवीर असल्याचे कधीही भांडवल केले नाही.

दादांचे वागणे, बोलणे, राहणे, पोशाख किती साधा. साध्या माणसांचा साधा प्रतिनिधी म्हणजे दादा. १९५२ साली ते आमदार झाले. ५२, ५७, ६२, ६७, ७२ असे सलग पाच वेळा आमदार होऊनही दादांनी कधीही ‘मला मंत्री करा,’ असे काँग्रेस नेत्यांना सांगितले नाही. दादांचा जीव मंत्रीपदात कधीच नव्हता. ६७ ते ७२ ही पाच वर्षे दादा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते.

१९६७ साली देशात नऊ राज्यांत काँग्रेसची सरकारे पराभूत झाली. महाराष्ट्रात दादा अध्यक्ष, वसंतराव नाईक मुख्यमंत्री या जोडीने काँग्रेसच्या २०२ आमदारांना निवडून आणले. १९७२ साली विधानसभा निवडणुकीत ही संख्या २२२ वर गेली.

महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात मोठा – ज्याला प्रचंड म्हणता येईल – तो विजय दादा प्रदेश अध्यक्ष असताना मिळाला. मग इंदिरा गांधींनी वसंतदादांना चक्क आदेश दिला आणि ते मंत्री झाले. त्यांच्याकडे पाटबंधारे खाते आले. दादा चौथीपर्यंत शिकलेले. म्हणजे शिक्षण जवळ जवळ नाहीच. पण व्यवहाराचे त्यांचे शिक्षण इतके मोठे होते की, दादा एक विद्यापीठच होते. न शिकलेल्या या माणसाला विद्यापीठाने पुढे डी. लिट. ही सन्माननीय पदवी दिली.

दादांचा मोठेपणा असा जगदमान्य झाला. दादा पाटबंधारे मंत्री असताना चाफेकर चीफ इंजिनीअर होते. दादा त्यांना विचारायचे, ‘कुठल्या खो-यात किती पाणी आहे?’ चाफेकर सांगायचे, ‘अमूक टीएमसी आहे.’ दादा म्हणायचे ‘टीएमसी सांगू नका, किती एकर भिजेल ते सांगा..’ दादांचा प्रत्येक शब्द असा व्यवहारी असायचा.

दादा चार वेळा मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात कशातही फरक पडला नाही. ते मुख्यमंत्री असोत किंवा राज्यपाल असोत, ते जेवत असोत किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन घेत असोत. त्यांना भेटायला कोणालाच कधी संकोच वाटला नाही. दादांच्या भोवती माणसे नाहीत, असा कधी दिवस नव्हता. आणि माणसांना भेटून दादा कंटाळले असेही कधी घडले नाही.

सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी कायदा कसा बदलता येतो, हे दादांनी महाराष्ट्राला शिकवले. दादा मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर एका जिल्हा परिषदेतून दुस-या जिल्हा परिषदेत कर्मचा-याची बदली होत नव्हती.

एका स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीचे लग्न ठरले. मुलगा पुण्यात, मुलगी औरंगाबाद जिल्हा परिषदेत. बदलीची मागणी झाली. बदली करता येत नाही, असे सांगण्यात आले. विषय दादांपर्यंत गेला. दादांनी संबंधित खात्याच्या सचिवाला बोलावले.

सचिवाने सांगितले, ‘दादासाहेब, आपला नियम असा आहे की, एका जिल्हा परिषदेतून दुस-या जिल्हा परिषदेत बदली होत नाही.’ दादा म्हणाले, ‘म्हणून तर तुम्हाला बोलावले. आजपासून एका ‘जिल्ह्यातून’ दुस-या ‘जिल्ह्यात’ बदली करता येईल, असा प्रस्ताव तयार करून माझ्याकडे आण आणि माझी सही घे..’ त्याच दिवशी संध्याकाळी शासनाने तसा निर्णय जाहीर केला. जे करायचे ते सामान्य माणसाच्या हिताचे असेल तर लगेच करायचे. त्यात कोणतीही लाल फित दादांना आडवी आली नाही.

आज जी नवी मुंबई उभी राहिली त्या नव्या मुंबईतल्या जमिनी सिडकोसाठी ताब्यात घेण्याचा सगळा विषय दादा मुख्यमंत्री असताना हाताळला गेला. त्याला आता चाळीस वर्षे झाली. फार मोठे आंदोलन झाले. दि. बा. पाटील त्या आंदोलनाचे नेते होते.

दादा मुख्यमंत्री होते म्हणूनच त्या काळात शेतक-याला चाळीस हजार रुपयांच्या पुढे भाव मिळाला. दादा शेतक-यांचे कैवारी होते.

राज्य कर्मचा-यांच्या संपात दादांची भूमिका कर्मचा-यांच्या ठाम विरोधात होती. संघटित लोकांना खूप फायदे मिळतात. असंघटित शेतक-याला असे फायदे मिळत नाहीत, हे दादा ठासून सांगायचे. पुढे दादांनी शेतकरी संघटना काढली. त्यासाठी ते मोर्चा काढून रस्त्यावरही उतरले.

दादा मुख्यमंत्री असताना त्यांना भाषेची अडचण कधीच आली नाही. मला इंग्रजी येत नाही, हिंदीत चांगले बोलता येत नाही, याचा संकोच त्यांना कधीच वाटला नाही. एकदा विधानसभेत चेंबूरचे जनसंघाचे आमदार हशू आडवाणी यांनी प्रश्न विचारला, ‘मुख्यमंत्रीजी, केंद्र सरकार महाराष्ट्र के लिए इतनी बडी राशी देने के बावजूद राज्य सरकार ये राशी क्यों नही उठा रही हैं..’

मुख्यमंत्री असलेले दादा उठले आणि त्यांनी सांगून टाकले, ‘अध्यक्ष महाराज, ऐसा है अंथरूण देखके पाय पसरना मंगता है..’ सारे सभागृह हसू लागले. त्यावेळचे मिश्कील आमदार केशवराव धोंडगे यांनी अध्यक्षांना विचारले, ‘अध्यक्ष महाराज हे उत्तर कोणत्या भाषेत आहे?’ दादाच उठले. आणि म्हणाले, ‘केशवराव, हशूजींकरिता हिंदीत आणि तुमच्याकरिता मराठीत. हाशूजी आपको समझा ना..’ हशूजींनी मान डोलवली.

निर्णय क्षमता हा दादांचा फार मोठा गुणविशेष होता. ते बोलत कमी. पण मनाला जे वाटेल ते लगेच कृतीत आणत. दादांना न विचारता प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदावर श्रीमती प्रभा राव यांची नियुक्ती श्री. राजीव गांधी यांनी करून टाकली. ही बातमी आली मात्र.. दादा मुख्यमंत्री कार्यालयातून उठले.

तडक राज्यपालांकडे गेले आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन घरी निघून गेले. कोणाला काय झाले समजायच्या आत ‘वर्षा’ हा सरकारी बंगला सोडून, मुख्यमंत्र्यांची सरकारी गाडी परत करून आपल्या बळीराम ड्रायव्हरला बोलावून दादा घरी गेलेसुद्धा. बातमी वा-यासारखी पसरली. कार्यकर्त्यांची गर्दी जमली. रात्री राजीव गांधींचा फोन आला.

राजीव गांधी समजावत होते. दादांनी स्पष्टपणे सांगितले, ‘मुख्यमंत्र्याला किमान अध्यक्षपदाचा बदल सांगून कराल की नाही? तुमची ही पद्धत मला मान्य नाही..’

आज पंचायत समितीचे सदस्यत्व कोणी सोडायला तयार होणार नाही. इथे दादांनी मुख्यमंत्रीपद सहज सोडून दिले. राजीव गांधींनी त्यांना राजस्थानचे राज्यपाल केले. त्या राज्यपाल पदातही दादा रमले नाहीत. कुठे बाहेर जायचे नाही, सरकारी कार्यक्रमांच्या बंधनात राहायचे. हे दादांना मानवत नव्हतं.

राजभवनवर लोकांना भेटायला अडचण होती. दादांनी राज्यपालपदही सोडून दिले. दादांना पदाचा लोभ कधीच नव्हता. त्यांच्या वागण्यात इतका साधेपणा होता की, त्यावेळचे सचिव दादांकडे असे बघत बसायचे. एकदा राज्यशिष्टाचार विभागाचा सचिव सांगू लागला की, ‘हरारेचे पंतप्रधान उद्या रात्री येत आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत मुख्यमंत्र्यांनी करावे, अशी दिल्लीहून सूचना आहे.’

दादांनी विचारले, ‘हे हरारे कुठे आहे?’ मग नकाशा आणून दादांना हरारे दाखवण्यात आले. नकाशात तिथे एक ठिपका होता. दादा म्हणाले, ‘अरे हे तर सांगलीपेक्षा लहान दिसते आहे. राज्यमंत्री अजहर हुसेनना पाठवून द्या..’ आणि दादा त्या पंतप्रधानांच्या स्वागताला गेले नाहीत. दादांचे असे किती किस्से आणि त्यांचे साधेपण असे कितीतरी प्रसंगात जाणवत राहायचे. ख-या अर्थाने ज्यांना लोकनेता म्हणता येईल, असे दादा यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा, राजाराम बापू अशी विकासाचा ध्यास घेतलेली माणसे आता होणे नाही.

वसंतदादांची खरी सेवा केली ती यशवंत हाप्पे यांनी. दादांचा तोच सेवक. दादांचे मुख्यमंत्रीपद गेले तेव्हा दादा म्हणाले, ‘यशवंता, आता तुला दुसरीकडे कुठे काम मिळाले, तर बघ बाबा.. तुझे नुकसान नको. ’ यशवंताच्या डोळय़ांत पाणी आले. तो म्हणाला, ‘दादा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही..’ यशवंत दादांना सोडून कधीच गेला नाही. दादांनी त्यांच्याच पुतण्याच्या लग्नमंडपात यशवंतचे लग्न करून दिले आणि त्याला जीवन जगता येईल, इतपत प्रतिष्ठेचा एक व्यवसायही उभा करून दिला.

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यानंरची एक घटना आहे.

सांगली इस्लामपूर रस्त्यावरून एक ट्रक चाललेला . ट्रकमधले लोक वसंतदादा पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत निघाले होते. रानातून घरी चाललेल्या एकानं त्या ट्रकला हात करत विचारलं.
“काय झालंय ?”
“आर , आपलं दादा मुख्यमंत्री झाल्यातीं” ट्रकमधल्या माणसानं सांगितलं.
“आपल वसंतदादा ?”
“होय . “
“मग चला मीबी येतो “
“आर पण तुझ्या अंगावर ही रानातली कापड हायती”
“त्येला काय हुतंय. आपुन दादास्नीच भेटायचं हाय. दादा आपलच हायती.”

अस म्हणत तो माणूस अंगावर असणाऱ्या फाटक्या बंडीवर आणि मळक्या धोतरावर मुंबईला निघाला .
शेकडो मैलाचा प्रवास करून ही गावाकडची माणस दादांच्या बंगल्यावर पोहचली .दादा अजून येणार होते म्हणून वाट पाहत बैठकीच्या खोलीत बसली. बसली . काही वेळानं दादा आले . आल्या आल्या त्यांचे लक्ष या नुसत्या बंडीवर आलेल्या कार्यकर्त्याकडे गेले . दादांनी त्याला विचारलं ,

“हरिबा असा कसा आलायस ?शर्ट कुठ आहे ?”

“दादा , तुम्ही मुख्यमंत्री झालेलं रस्त्यात कळलं .आता घरी कवा जावू आणि कापड कवा घालू ? तवर ही माणस निघून आली असती . म्हणून तसाच आलू.”

ते ऐकून दादा हेलावले . त्यांनी लगेच त्याच ठिकाणी आपल्या अंगातील शर्ट काढला आणि त्या हरीबाला घालायला दिला. दादा आत गेले दुसरा शर्ट घालून आले . आपल्या कार्यकर्त्याचे भोळे भाबडे प्रेम पाहून त्याला आपल्या अंगातील शर्ट काढून देणाऱ्या वसंतदादा हे लोकांना आठवत राहतात आणि त्यांच्या साधेपणाच्या कथा आजही घराघरातून सांगितल्या जातात.

आजचे नेते सामान्य माणसांच्या प्रश्नांला फारसे महत्व देत नाहीत. एखादा गरीब माणूस जर स्वतःची समस्या घेऊन नेत्याकडे गेला तर नेता बोलायच्या अगोदर नेत्याच्या भोवती बसलेले त्याचे अनुयायीच त्या माणसावर खेकसतात, म्हणतात”हे काम सायेबांना सांगतोयस?काय किमंत घालवतोय काय आमच्या सायेबांची”हे अनेकांनी अनुभवलेलं असतं. साहेब आणि त्यांच्या अनुयायांना किरकोळ वाटणार काम त्या माणसासाठी खूप महत्त्वाचं असतं. अशा साहेबांच्यासाठी आणि त्याच्या भोवतीच्या लोकांसाठी वसंतदादा पाटील यांचा एक किस्सा आवर्जून सांगितला पाहिजे.

एकदा काय झालं दादांचा एका बालमित्राला विहिरीवर बसवायचं इंजिन घ्यायच होत. तो पैसे फेट्यात बांधून थेट मुंबईला गेला. चौकशी करत करत त्यांच्या बंगल्याच्याजवळ गेला.त्याला पोलीस आत सोडत नव्हते. तो तिथंच उभा राहिला. योगायोगानं दादा कुठेतरी बाहेर निघालेले. या मित्रानं त्यांना जोरानं हाक मारली
“वसंता है….
ती गावाकडच्या माणसाची हाक ऐकून दादांनी मागे वळून पाहिले. दादा त्याच्याकडे आले.कडकडून मिठी मारली. ज्या पोलिसांनी त्याला अडवले होते. ते हा प्रसंग पाहून चकित झाले. अधिकारीही अवाक झालेले. राज्याचे मुख्यमंत्री एका शेतकऱ्याची गळाभेट घेत होते.
त्यांनी विचारलं
“अस अचानक कसा आलास?”
“वसंता, गेल्यासाली हिर पाडली. पाणी लागलंय चांगल.औंदा इंजन बसवायचं हाय. तुझ्या ओळखीन म्हटलं चांगलं इंजेन मिळलं,म्हणून आलूया”असं म्हणत त्यांनी फेट्यातला नोटांचा पुडका दादांच्या हातात दिला.दादा त्याला म्हणाले,”राहूदे ठेव तुझ्याजवळ. आता आलास तर दोन दिवस रहा”
त्या गावाकडच्या मित्राला आपण इंजिन खरेदी करायचं काम मुख्यमंत्र्यांना सांगतोय याच काहीही वाटत नव्हतं.कारण दादा त्याला आपले वाटत होते. आणि दादानाही त्यानं हे काम सांगितलं यात कसलाही कमीपणा वाटत नव्हता. दादा हे दादाच होते. दादांनी त्याच इंजिन घेऊन त्याच्या घरी पाठवलं.आणि सांगलीला जाताना त्याला सोबत घेऊन गेले.

विशेष म्हणजे दादांनी ही गोष्ट जाहीर सभेत कधी सांगितली नाही. प्रचारात सांगितली नाही, या घटनेची जाहिरात केली नाही. कारण अशा कित्येक गोष्टी होत्या सागण्यासारख्या.कोणकोणत्या गोष्टी सांगायच्या?आजचे नेते असे वागत नाहीत…
आणि चुकून कोणी वागले तर त्याची बातमी होते….

दादांच्या आयुष्यात बातमी बनण्यासारख्या शेकडो गोष्टी घडल्या. पण त्याच्या बातम्या झाल्या नाहीत. पण आदरणीय दादांच्या त्या सगळ्या आठवणी लोकांनी अंतःकरणात जपून ठेवल्या आहेत…..

उल्हास पाटील सरांच्या वॉलवरून

तेरा नोव्हेंबर दादांचा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन💐💐💐

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button