राज्यात दहावीचा ९६.९४ निकाल, मुलांपेक्षा मुलींची बाजी!
कोकण विभागाचा सर्वाधिक 99.27 टक्के तर नाशिकचा सर्वात कमी निकाल 95.90 टक्के
पुणे दि.१७
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा( ssc)निकाल आज जाहीर झाला यात मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली
– या वर्षाचा राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के इतका लागला असून, सकाळी ११ वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. दुपारी १ वाजता सविस्तर निकाल ऑनलाईन जाहिर केला आहे. राज्यातील १२,१२० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातील २९ शाळांमध्ये शून्य टक्के निकाल लागला आहे.
या निकालाचे वैशिष्य असे, की उत्तीर्ण मुलींचा ९७.९६ तर मुलांचा ९६.०६ टक्के इतका निकाल लागला आहे. गुणवत्तेत सरस असल्याचे मुलींनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिद्ध करून दाखवले. परीक्षा देणार्या मुलांच्या तुलनेत १.०९ टक्के मुली जास्त उत्तीर्ण झाल्या आहेत.
राज्यात यंदा १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ०३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९.२७ तर सर्वात कमी निकाल ९५.९० हा नाशिक विभागाचा लागला आहे.
यंदा राज्यात ९ विभागीय मंडळामार्फत १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान इयत्ता दहावीची परीक्षा झाली होती. १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थी राज्यभरातून या परीक्षेस बसले होते. विद्यार्थ्यांना गुणनिहाय निकाल पत्रिका ऑनलाईन देण्यात येत आहे.
त्याची प्रिंटदेखील काढली जाणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुण पडताळणीसाठी अर्ज करण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी सोमवार, २० जून ते बुधवार २९ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी प्रति विषय ५० रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागतील. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या प्रक्रियेसाठीचे शुल्क ऑनलाईन पध्दतीनेच भरावे लागणार आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
कोकण – ९९.२७ टक्के
कोल्हापूर – ९८.५० टक्के
लातूर – ९७.२७ टक्के
नागपूर – ९७ टक्के
पुणे – ९६.९६ टक्के
मुंबई – ९६.९४ टक्के
अमरावती – ९६.८१ टक्के
औरंगाबाद – ९६.३३ टक्के
नाशिक – ९५.९० टक्के
या संकेतस्थळावर पहा दहावीचा निकाल
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
———–