इतर

सांगवी भुसार व मायगाव देवी येथे तहसीलदारांच्या प्रयत्नांने शेतरस्ताचा वाद मिटला !

शिर्डी, दि. १५ – कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार व मायगाव देवी येथे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शेतरस्ता वादाचा तहसीलदार महेश सावंत यांच्या मध्यस्थीने सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. वादी-प्रतिवादींनी एकत्र येत वादावर तोडगा काढल्याने समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.

सांगवी भुसार येथे दोनदा न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतरही वाद मिटला नव्हता. न्यायालयीन लढाई, वेळ आणि खर्चामुळे दोन्ही बाजूंना त्रास होत होता. अखेर महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात जाऊन दोन्ही पक्षांना एकत्र बसवले आणि संवादातून सामंजस्य घडवून आणले. दोघांनीही मोठेपणा दाखवत शेतरस्ता खुला करण्यास सहमती दर्शवली. उपस्थित पंचमंडळींनी प्रशासनाच्या या प्रयत्नांचे कौतुक केले.

मायगाव देवी येथेही अशीच परिस्थिती होती. विशेष म्हणजे, हा वाद जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या शेतीशी संबंधित होता. वादाच्या सुरुवातीला तणाव निर्माण झाला होता, मात्र तहसीलदारांच्या संयमी आणि संवेदनशील हस्तक्षेपाने दोन्ही पक्ष सहमत झाले. न्यायालयाच्या दारात गेल्याशिवाय वाद मिटवता येतो, हे लक्षात घेत त्यांनी शेतरस्ता खुला करण्याचा निर्णय घेतला. शेवटी, वादी-प्रतिवादींनी एकमेकांना मिठी मारून समाधान व्यक्त केले.

तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितले की, “शेतरस्त्यांचे बरेचसे वाद हे गैरसमज व हट्टीपणामुळे वाढतात. न्यायालयीन प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असते. त्यामुळे प्रशासनाने संवाद आणि सामंजस्याच्या मदतीने वाद मिटवण्याचे धोरण राबवले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम सुरू आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास अशा अनेक वादांचे जागेवरच निराकरण होऊ शकते.”

या घटनांमुळे प्रशासनाच्या समंजस हस्तक्षेपाने वाद मिटवता येतात, हा सकारात्मक संदेश ग्रामीण भागात गेला आहे. महसूल प्रशासनाच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button