विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी ट्रस्ट उभारण्याची आवश्यकता – चंद्रकांत गुडेवार

सोलापूर : सोलापूरात बहुतांश पद्मशाली समाजबांधव गरीब व होतकरु आहेत. अशा कुटुंबातील अनेक विद्यार्थी हे गुणवंत आहेत पण आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे असे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही. अशांसाठी पद्मशाली समाजबांधवांनी पुढाकार घेऊन एक ट्रस्ट उभारुन निधी जमविण्याची गरज आहे. असे केल्यास अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. दहावीपासून ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे. असे आवाहन नाशिक येथील तत्कालीन विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले.
रविवारी सकाळी श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली फौंडेशन तर्फे पद्मशाली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर तथा पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष महेश कोठे, आधुनिक सारथीचे संस्थापक श्रीनिवास बुरा, ‘जेडपी’तील माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण उपनिरीक्षक स्मिता नडिमेटला, पद्मशाली फौंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल, दयानंद कोंडाबत्तीनी, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती हे होते. ते पुढे म्हणाले, समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजातील प्रत्येक घटकाने याकामी आर्थिक योगदान दिल्यास हुशार व गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. वास्तविक पद्मशाली समाजामध्ये जन्मजात टॅलेंट आहे. त्यांचा बुद्ध्यांक चांगला असल्यामुळे त्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी प्रोत्साहनाची गरज आहे. नवनवीन ज्ञानाबरोबर नवनवीन तंत्रज्ञानही आत्मसात करण्याची या समाजाला खूप गरज आहे. यापैकी नवीन तंत्रज्ञान अद्ययावत ठेवण्यात हा समाज मागे असल्यामुळे वस्त्रोद्योगासह अनेक क्षेत्रात समस्या दिसून येतात. तेव्हा नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले नाही तर हा समाज प्रगतीपासून वंचित राहू शकतो. हे ओळखून समाजाने काळानुरूप पुढे जाण्याची गरज आहे.
याप्रसंगी बोलताना माजी महापौर महेश कोठे म्हणाले की, पद्मशाली विद्यार्थ्यांनी मी काहीतरी करु शकतो अशी खूणगाठ बांधून वाटचाल करण्याची गरज आहे. अभ्यासातील महत्त्वाच्या विषयांबाबत न्यूनगंड न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास विद्यार्थी शिक्षणात यशस्वी होऊ शकतात. जीवनात मोठ्या पदावर जाण्यासाठी प्रसंगी विद्यार्थ्यांना संघर्ष करण्याची गरज आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे हेरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले. याच शिक्षणाच्या जोरावर त्यांनी देशाची घटना लिहिली. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रत्येकानेच प्रेरणा घेण्याची गरज आहे. अभ्यासाबरोबरच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ दिल्यास प्रत्येक विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना समाजबांधवांकडून प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे.
२०२३ पासून श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थींनी व विद्यार्थ्याला ‘पद्मज्योती’ व ‘पद्मएकलव्य’ पुरस्कार देण्यात येत असून यंदा श्रावणी नडिमेटला तर, श्लोक पुंजाल यांना सन्मान चिन्ह, शॉल श्रीधर सुरा यांच्या वतीने देण्यात आले. तसेच सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लबच्या संचालिका सौ. वेणी विठ्ठल वंगा यांनी जाहीर केल्याप्रमाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या ३ विद्यार्थ्यांना ३ महिन्याचे स्पोकन इंग्लिश कोर्स नडिमेटला, पुंजाल तर तृतीय क्रमांकासाठी चैत्राली मेरगू व प्रणव साखरे हे दोन विद्यार्थी सेम गुण मिळवल्याने पेच निर्माण झाल्याने तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवत दोघांनाही शिकवण्याचे जाहीर केले. याप्रसंगी जवळपास ११० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. पालकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होते. अंबादास कुडक्याल यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. विमल नामपल्ली तर, शेवटी प्रा. सपना मिठ्ठापल्ली यांनी आभार मानले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती, सतीश चिटमील आणि बालराज द्यावरकोंडा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
