प्रतिकूल काळातही शिवाजी महाराज यशस्वी राज्यकर्ते होते – उमेश चव्हाण

पुणे – सतत होणाऱ्या लढाया, जाचक ‘कर’ वसुली, स्त्री्यांच्या अब्रूची हेळसांड, उध्वस्त झालेला उद्योग व्यापार, शेतीची झालेली दुरावस्था, नागरिकांच्या मनात पसरलेल्या भीतीने पुण्यासह राज्यातील अनेक शहरे उध्वस्त झालेली होती. अशावेळी माता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी इथल्या जनतेला अभय दिले. गाढवाचा नांगर फिरवलेल्या शेतीत सोन्याचा नांगर फिरवला. शेतकऱ्यांच्या शेतीची काळजी घेतली. आयबायांच्या अब्रूला धक्का लावला तर प्राणदंडाची शिक्षा दिली. दुष्काळात काहीच पिकले नाही तर संपूर्ण शेतसारा ‘माफ’ केला. जनतेला सुरक्षित ठेवले. जनतेच्या हिताचे निर्णयाची फक्त सवंग घोषणाबाजीच नव्हे तर काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळेच शिवाजी महाराज गेली 400 वर्षे जनतेच्या हृदयात जिवंत आहेत, जोपर्यंत पृथ्वी अस्तित्वात राहील, तोपर्यंत त्यांची जयंती उत्साहात साजरी केली जाईल, कारण प्रतिकूल काळातही शिवाजी महाराज हे यशस्वी राज्यकर्ते होते, असे मत रुग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
पुण्यातील नवी पेठ येथील साईमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर जाणीव संघटनेचे प्रमुख कार्यवाह संजय शंके, अखिल टिळक रोड दहीहंडी उत्सव समितीचे केदार मानकर, जाणीव संघटनेचे पुणे शहराध्यक्ष विनायक दहिभाते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मच्छिंद्र उत्तेकर, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष अपर्णा साठ्ये – मारणे आणि मुख्य संयोजक तथा साईमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत हत्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नागरिकांना वैद्यकीय मदत कशी मिळवावी? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच वैद्यकीय आरोग्य आधार कार्ड चे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक दीपक पोटे, रेश्मा जांभळे, सुशांत शेळके, यशवंत भोसले, सचिन पोटे यांचा साई मुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
