व्यंगचित्र कार अरविंद गाडेकरांच्या उपक्रमास चांगला प्रतिसाद

संगमनेर- रोटरी क्लबने आयोजित केलेल्या ‘आनंदी रस्ते’ हा उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला. सकाळी ८ ते १० या वेळेत चाललेल्या या उपक्रमात संगमनेरचे प्रसिध्द व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी सहभाग घेतला. प्रेक्षक एक रेष बोर्डवर काढायचे आणि गाडेकर त्यातून हास्यचित्रे साकारायची. लहानांपासून वृध्दांपर्यंत अनेकांनी यात सहभाग नोंदवला आणि व्यंगचित्र साकारल्यावर त्यांच्या चेह-यावर उमटले हास्य. तसेच विनोदी आणि मार्मिक व्यंगचित्रे संवादातून सादर करीत त्यांनी प्रेक्षकात उठवली हास्याची लहर. लहानमुलांच्या हाती कार्डशीट आणि स्केचपेन देत मुलांनी साकारली त्यांच्या मनातील चित्र. छोटा भीम, आईस्क्रिम, केक आणि कितीतरी छान चित्र मुक्त हस्ते या मुलांनी रंगवली. मुलांच्या आणि पालकांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता. गाडेकरांच्या व्यंगचित्रांना प्रेक्षकांनी दाद दिली.
