इतर

गटशेतीमुळे तरूणांच्या जीवनमानात कायापालट

कृषी – यशोगाथा
एकरी १० लाखांचे उत्पन्न घेतायेतं तरूण शेतकरी !
गटशेतीमुळे तरूणांच्या जीवनमानात कायापालट
‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय शासनाच्या गटशेती
योजनेच्या माध्यमातून दिसून येतो. शासनाच्या गटशेती योजनेत अकोले तालुक्यातील विरगाव येथील तरूण
शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी गट व शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. आज या कंपनीच्या माध्यमातून हे तरूण
शेतकरी १०८ एकर शेतीचे उत्कृष्ट व्यवस्थापन करत आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल ३ कोटी रूपयांची असून पूर्वी
जेमतेम एकरी १ लाख रूपये उत्पन्न घेणारे तरूण आता गटशेतीच्या माध्यमातून एकरी १० लाख रूपयांचे उत्पन्न घेत
आहेत. गटशेतीच्या या अभिनव प्रयोगाने या तरूण शेतकऱ्यांच्या जीवनमानात कायापालट झाला आहे.
शेतकऱ्यांचे पीक उत्पादन वाढविण्यासाठी निविष्ठा, प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, काढणी पश्चात
तंत्रज्ञान, कृषीमाल प्रक्रिया व पणन इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. यासर्व गोष्टींसाठी अनुदान व मदत महाराष्ट्र
शासनाच्या गटशेतीस प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून दिले जाते. ही गोष्ट हेरून वीरगाव येथील तरूण शेतकऱ्यांनी
कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले आणि २०१५ मध्ये कृषी संजीवनी डाळिंब व भाजीपाला उत्पादक गटाची स्थापना केली.
प्रत्यक्षात २०१९ मध्ये हा गट कार्यरत झाला. गटशेती अंतर्गत खते व औषधे एकत्रित खरेदी केल्यानंतर सवलत मिळत
होती. यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत व्हायची. या गटाच्या कामाला व्यापक स्वरूप देण्यासाठी २०२० मध्ये कृषी
जननी फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली. आज या कंपनीच्या माध्यमातून यशस्वी व आदर्श शेती
व्यवसाय करत आहे.
घरगुती आणि हॉटेल व्यवसायात ढोबळी मिरचीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यातून शेतकऱ्यांना वर्षभर
पीक घेऊन शाश्वत उत्पन्न मिळेल. या हेतूने ढोबळी मिरची, काकडी व झेंडू पिकाची वीस सदस्यांच्या १०८ एकर
क्षेत्रापैकी साडेअठ्ठावीस एकरवर शेडनेटमध्ये लागवड करतात. शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीचा हिरवा व रंगीत मिरचीचा
यशस्वी प्रयोग या गटाने केला आहे. संपूर्ण शेतीसाठी ठिबक सिंचन केलेले आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतंत्र
विहीर व शेततळे आहे. पिकाची वेळोवेळी देखरेख करुन आणि कृषी सल्लागाराला थेट बांधावर आमंत्रित करुन सल्ला
घेतात. यदा कदाचित एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची लक्षणे दिसू लागली तर तत्काळ
प्रतिबंधात्मक उपाय करतात.
ढोबळी (सिमला) मिरची व काकडीचे प्रतिदिन दोन टनापर्यंत उत्पादन घेतात. या शेतमालाची प्रसिद्ध
व्यापाऱ्यांना बोलावून कंपनीद्वारे जागेवरच विक्री करतात. रोख पैसे घेऊन कंपनी यासह इतर रक्कम पंधरा दिवसांनी
शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करतात. उत्पादित माल गटाने स्वतः बांधलेल्या भव्य पॅकिंग हाऊसमध्ये संकलित करतात.
या शेतकरी गटामध्ये तरुण शेतकरी गणेश तोरकड, जालिंदर खुळे, संतोष वर्पे, भानुदास बोडखे, संतोष
अस्वले, विनायक शेळके, अनिल पानसरे, सतीष सहाणे, नारायण सोनवणे, अनिल देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे,
भास्कर सहाणे, शरद तोरकड, संदीप तोरकड, उमेश तोरकड, संजय खुळे व रवींद्र खुळे असे एकूण वीस सदस्य
आहेत. गणेश तोरकड हे गटाची अध्यक्षपदाची तर जालिंदर खुळे हे सचिवपदाची धुरा सांभाळत आहेत. कंपनीच्या
माध्यमातून गटशेती करणाऱ्या सर्वच्या सर्व वीस सदस्यांची आर्थिक उन्नती होत आहे.
दिवसेंदिवस प्रगतीचा आलेख उंचच ठेवण्यासाठी गटातील सदस्यांनी गोठा निर्मितीचा निर्णय घेतला आहे.
सध्या हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. देशी गायींचे पालन करुन शेण, गोमूत्र, दूध यांपासून उत्पादनांची निर्मिती करुन
विक्री करणार आहेत. गटातील सतीष सहाणे हे सॉफ्टवेअर डेव्हलपरची नोकरी सोडून उत्तम शेती करत आहे.
गटाची दर महिन्याच्या पाच तारखेला बैठक होते. तत्पूर्वी व्हाटसअॅप गुरपवर चर्चा करतात. यावरच अनेक
विषयांचा उहापोह करतात. त्यानंतर बैठकीत त्यास मूर्त रुप देतात. दर पंधरा दिवसांनी प्रत्येक सदस्याच्या शेताला
भेट देऊन पाहणी करतात. या गटशेतीसाठी शासनाकडून ६० टक्के अनुदान मिळते. यातील ७५ टक्के सामूहिक व २५
टक्के वैयक्तिक लाभासाठी मिळते. या आदर्श गटाला आत्तापर्यंत १० कोटी ८० लाखांच्या आसपास खर्च झाला आहे.

यातील ४ कोटी अनुदान मिळाले आहे.
संगमनेर उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, अकोल्याचे तत्कालिन कृषी अधिकारी प्रवीण गोसावी
व विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले असल्याचे हे तरूण सांगतात.
“या शेतकरी गटाला कृषी विभागाचे पाठबळ मिळाले आहे. गटाने दर्जेदार भाजीपाला उत्पादनातून
जिल्ह्यासह अन्य भागातंही नावलौकिक मिळवला आहे. एकत्र आल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे
कृषी मालाचा दर ठरविण्याची या गटाला साधता आली.” अशी प्रतिक्रिया संगमनेर उपविभागीय कृषी अधिकारी
सुधारक बोराळे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button