महानुभाव पंथाचे आद्यप्रवर्तक व अवतारस्वरूप श्री चक्रधर स्वामी

महादर्पण वृत्तसेवा
महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या 803 वा अवतारदिन जयंती 5 सप्टेंबर रोजी
आहे आणि त्याच दिवशी ‘शिक्षक दिन’ सुद्धा आहे, हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. बाराव्या शतकाच्या
पूर्वार्धात गुजरातमधील भडोच येथे शके ११४२, भाद्रपद महिना, शुक्ल पक्षाच्या रविवारी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा
अवतार झाला. मोर्शीजवळील सालबर्डीच्या डोंगरावर काही वर्षे रहिवास, त्यानंतर विदर्भ व मराठवाडा या प्रदेशांत भ्रमण
करीत ते तेलंगणात (आंध्र प्रदेश) तुंगभद्रेपर्यंत गेले, ‘दक्षिण काशी’ पैठणला काही काळ राहिले, शेवटची आठ वर्षे त्यांनी
महाराष्ट्रातच घालविली. खेडोपाडी जाऊन आपल्या तत्त्वज्ञानाचा आणि आचारधर्माचा उपदेश केला. त्यांनी आपले
संपूर्ण तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना रुचेल, समजेल अशाभाषेत सांगितले. विशेष म्हणजे हे कार्य स्वामींनी त्या काळात
प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेतून न सांगता मराठी भाषेतून सांगितले.
समाजासाठी प्रेरक कार्य:
महानुभाव पंथाचे आद्यप्रवर्तक व अवतारस्वरूप श्री चक्रधर स्वामी यांनी बाराव्या-तेराव्या शतकात आपल्या
संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये सूत्ररूपाने सांगितली व अनेक महानुभाव संतकवींनी व भाष्यकारांनी भाष्यग्रंथ
लोकभाषा मराठीत लिहून (उदाहरणार्थ: सूत्रपाठ, साती ग्रंथ (यात नरेंद्रांचे ‘रुक्मणीस्वयंवर’; भास्करभट्ट बोरीकरांचे
‘शिशुपालवध’ व ‘उद्धवगीता’, दामोदर पंडितांचा ‘वच्छाहरण’, रवळो व्यासकृत ‘सैह्याद्रिवर्णन’, पंडित विश्वनाथ
बाळापूरकर यांचा ‘ज्ञानप्रबोध’ आणि पंडित नारायण व्यास वहाळिये यांचे ‘ऋद्धिपूरवर्णन’ यांचा समावेश होतो),
आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ) भारतीय तत्त्वज्ञानात मोलाची भर घातली आहे. या सर्व रचनेत
श्री चक्रधरांचे चरित्र व शिकवणूक हाच विषय प्राधान्याने आहे. पंडित म्हाइंभट सराळेकर लिखित मराठीतील पहिला गद्य
चरित्रग्रंथ ‘लीळाचरित्र’ याचे केंद्रबिंदू श्री चक्रधर स्वामी आहेत. इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला
नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील
समाजसुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल. श्री चक्रधर स्वामी आणि पुढे इतर संतांनी केलेला लोकभाषेचा
या काळातील एक मोठे सांस्कृतिक कार्य होते.
सामाजिक समतेचे आद्यप्रवर्तक
पुरस्कार
हे
श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी
खुली झाली. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींकडे सामाजिक समतेच्या आद्यप्रवर्तकाचा पहिला मान जातो. त्या काळानंतर
हातामध्ये समाजाची सूत्रे असणाऱ्यांनी श्री चक्रधरांच्या विचार व स्वार्थाआड येऊ पाहणाऱ्या सर्वसमावेशक विचारांना
सर्वसामान्यांपासून हेतुपुरस्सर दूर ठेवले व श्री चक्रधर स्वामींचे समतेचे तत्त्वज्ञानही उपेक्षित ठेवले गेले, असा आरोप
होतो. हा त्रास जो श्री चक्रधर स्वामींच्या आधुनिक विचारांना झाला, तोच महात्मा फुले, सावित्रीबाई, रयतेचा राजा श्री
शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तत्कालीन प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या महापुरुषांनाही झाला. तीच प्रथा आजही
सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात दिसून येत आहे. आजच्या काळात त्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करण्याची आवश्यकता
वाटू लागली आहे, नव्हे ती गरज बनली आहे.
धर्मक्रांती:
श्री चक्रधरांची धर्मक्रांती ही सनातन्यांच्या डोळ्यांत एक झणझणीत अंजन होते, असे बोलले जाते. बाराव्या
शतकात, महाराष्ट्रात कर्मकांडाचे प्रस्थ वाढून सकाम भक्तीचे बंड माजले होते. सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या महानुभाव
पंथाने (“महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः” या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो
महानुभाव पंथ), जातिनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्त्वाचा पुरस्कार केला. समाजात चातुर्वर्ण्याची मिरासदारी वाढलेली
असण्याच्या काळात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वैदिक तत्त्वज्ञानाला बाजूला करून, ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय
करून आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. कर्मकांडाचा निषेध केला आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर हल्ला चढविला. एक
सामाजिक गरज म्हणून महानुभाव पंथात त्यांनी स्त्रिया, शूद्र व बहुजनांना सामावून घेऊन जातिभेद आणि स्त्री-पुरुष भेद दूर
करण्याचे कार्य केले. धर्माचे रहस्य आपल्या बोली भाषेत सांगणाऱ्या बौद्ध आणि जैन संप्रदायांप्रमाणे जनभाषेत आपले
तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला.
विचारांची अष्टशताब्दी वाटचाल :
‘महानुभाव’ या नावाने हा पंथ जरी आज ओळखला जात असला, तरी त्याची ‘महात्मा’, ‘अच्युत’,
‘जयकृष्णी’, ‘भटमार्ग’, ‘परमार्ग’ अशी अन्य नावेही आहेत. ‘भटमार्ग’ हे नाव पंथ संस्थापक श्री चक्रधर स्वामींचे प्रथम
आचार्य नागदेव किंवा भटोबास यांच्या नावावरून आलेले आहे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही अनादि व अनंत
मूळ चार तत्त्वे असून परमेश्वर नेहमी मनुष्यरूप धारण करून अवतार घेतो. अविद्येपासून मुक्त होऊन ईश्वरस्वरूपाचा आनंद
भोगण्याची पात्रता जीवाच्या ठिकाणी असल्याने महानुभावांनी जीवास ‘बद्धमुक्त’ मानले आहे. जिथे जिथे परमेश्मवर
अवतारांचा संबंध आला अश्या जागांना महानुभाव पंथीय “स्थान” म्हणतात, अशी भारतात १,६५० स्थाने आहेत,
त्यातील काही काळाच्या ओघात लोप सुद्धा पावलेली आहे. महानुभावांचे उपदेशी वर्ग लौकिक जीवनात आणि
संन्यासदीक्षेनंतर जातिनिर्बंध मानत नाहीत. या संप्रदायाच्या समाजावादी व चातुर्वर्ण्यविरोधी विचारसरणीमुळे मोठय़ा
प्रमाणात अनुयायी लाभले आहे.
श्री चक्रधरांनी राज्य- ऐश्वर्य, धन-दौलतीचा त्याग केला, गोरगरिबांचे अश्रू पुसले, त्यांच्यात आत्मबळ निर्माण
केले, स्वत्वाची जाणीव निर्माण केली, भेदाभेद अमंगळ आहेत, हेच शिकविले. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा,
अंधश्रद्धांनी मरगळलेल्या बुद्धीवर विवेकाचे, प्रबोधनाचे शिंपण केले. महाराष्ट्राच्या भूमीत पुरोगामी विचारांचे सर्वप्रथम
बीजारोपण केले. पुढे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकारामांपासून छत्रपती शिवराय, राजाश्री शाहू महाराज, महात्मा
फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हीच महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा समृद्ध केली. प्राणिमात्रांवर दया करावी, हिंसेच्या
कालखंडात अहिंसा धर्म सांगितला, कोणत्याही जिवाला त्रास देऊ नये, खराटा घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा वसा,
माणूस हा एकच वर्ण व जात, माणुसकी हाच एकमेव धर्म, माणसामाणसांमध्ये समानतेची, मोकळेपणाची सहज
वागणूक, अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार, अशी श्री चक्रधर स्वामींची शिकवण होती. आज अनेक संदर्भ बदलले आहेत.
तरी अजूनही स्वामींचे ‘डोळस’ तत्त्वज्ञान ठिकठिकाणी सांगितले जाते. श्री चक्रधर विचारांचे खरे दीपस्तंभ आहे.
अवतारकार्य आणि समाजपरिवर्तनाच्या अष्ठशताब्दी वर्षात ‘मराठी भाषा विद्यापीठ’ ही खरी आदरांजली ठरणार आहे,
म्हणून स्वामींच्या कार्यकर्तृत्वाला मनापासून दंडवत…
शब्दांकन –
प्रा. सतीश साहेबराव वैराळ
(इंग्रजी विभाग, रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर)
20