माझी वसुंधरा अंतर्गत संगमनेर तालुक्याला अडीच कोटीची बक्षीसे

संगमनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध स्तरावरती माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या बक्षीसांसाठी संगमनेर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. यासाठी राज्य सरकारच्या वतीने अडीच कोटीची बक्षिसे प्राप्त होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी मा. अनिल नागणे यांनी दिली.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर, २०२० राबवले जाते. माझी वसुंधरा अभियान ३ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२२ ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ३ मध्ये राज्यातील ४११ नागरी स्थानिक संस्था व १६ हजार ४१३ ग्रामपंचायती अशा एकूण १६ हजार ८२४ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.
माझी वसुंधरा अभियान ३ अंतर्गत निर्गमित करण्यात आलेल्या टूलकिटनुसार डेस्कटॉप असेसमेंट करिता नागरी स्थानिक संस्थांचे विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ३ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फिल्ड मूल्यमापन त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोनही मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियानामधील लोकासंख्यानिहाय ११ गटातील विजेते तसेच, महसूल विभाग व जिल्ह्याच्या एकूण कामगिरी वरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची निवड करण्यात आली आहे. गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संगमनेर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
10 हजार लोकसंख्येवरील ग्राम पंचायत गटात राज्यात द्वितीय पारितोषिक गुंजाळवाडी गावाने पटकावले आहे.यासाठी ग्रामपंचायतीला 1.5 कोटी रुपयेचे बक्षीस मिळणार आहे. 2.5 ते 5 हजार लोकसंख्या गटात नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पेमगिरी गावाला जाहीर झाले आहे.त्याकरीता बक्षीस म्हणून 50 लाख रुपये मिळणार आहे.2.5 हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटात नाशिक विभागात प्रथम क्रमांक तिगाव या गावाला पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.यासाठीचे बक्षीस 50 लाख रुपये असणार आहे. तीन बक्षीस मिळालेला संगमनेर राज्यातील एकमेव तालुका आहे.
सर्वांच्या प्रयत्नाचे फलित.. अनिल नागणे
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत संगमनेर तालुक्याला सुमारे अडीच कोटीची बक्षीस जाहीर झाली आहेत. तालुक्यातील तीन गावांना ही बक्षिसे मिळाली आहेत. हे सर्व यश पंचायत समिती ,ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रयत्नाचे फलित आहे. एकाच वेळेस, एकाच तालुक्याला तीन पारितोषिक प्राप्त करणारा संगमनेर तालुका एकमेव तालुका ठरला आहे. प्रशासन ,नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे येऊन काम केले तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगमनेरचे हे यश आहे.या पुढच्या कालावधीत तालुक्यातील अधिकाधिक ग्रामपंचायती शासनाच्या विविध उपक्रमामध्ये सहभागी करून अधिक उत्तम, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामकाजासाठी सर्व मिळून प्रयत्न करू. तसेच अधिकाधिक लोकांपर्यंत उत्तम सेवा देण्याबरोबर अधिकाधिक बक्षिसे मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आज प्राप्त झालेल्या यशासाठी योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी,अधिकारी ,कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन..
श्री अनिल नागणे,
प्रशासक तथा गटविकास अधिकारी ,पंचायत समिती संगमनेर
ज्या ग्रामपंचायत नगरपालिका नगरपरिषदांना माजी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत बक्षिसे जाहीर झाले आहेत त्यांना मिळणाऱ्या रकमेतून पुढील प्रमाणे कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत त्यात शहराचे / गावाचे हरित अच्छादन वाढविण्यासाठी करावयाच्या उपाय योजनेत जैवविविधतेच्या संवर्धनासह कार्यक्रम हाती घेता येणार आहे. मियावाकी वृक्षारोपण अमृत वन,स्मृती बने ,शहरी बने,फुलपाखरू उद्यान, सार्वजनिक उद्याने,जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल जैवविविधतेच्या संवर्धन.
रोप वाटीकांची निर्मिती. जलसंवर्धनाचे उपक्रम
रेन वॉटर हारवेस्टिंग व परकोलेशन.नदी, तळे व नाले यांचे पुन: र्जिविकरण/ सौंदर्यीकरणाचे उपक्रम
. नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या उपाय योजना.सौरउर्जेवर चालणारे / एलईडी चालणारे दिवे.विद्युत वाहनांना प्रोत्साहन म्हणून चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे उपक्रमाची अंमलबजावणी करता येणार आहे.