अबब परसबागेत तब्बल 5 फुटाचा दुधी भोपळा

अकोले प्रतिनीधी
निसर्ग अद्भुत आहे याचा परिचय देवगाव , तालुका -अकोले येथे सध्या येत आहे.येथील फूड मदर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या ममताबाई भांगरे यांच्या परसबागेत तब्बल साडेपाच फुटांचा दुधी भोपळा लगडला आहे.
सेंद्रिय शेतीच्या प्रचारक व प्रसारक म्हणून जगात आपली ओळख असलेल्या फूड मदर ममताबाई भांगरे यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या परसबागेत दुधी भोपळ्यांचा मंडप उभारला आहे या मंडपात सुमारे पंधरा ते वीस दुधी भोपळे लागले आहेत. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या या दुधी भोपळ्यांची राज्य नव्हे तर देश आणि विदेशात सुद्धा दखल घेण्यात आली आहे. बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मार्गदर्शनाने गेली पंधरा वर्ष ममताबाई भांगरे कार्य करत आहेत.
परसबागेची उत्तम जाण असलेल्या ममताबाई यांनी आपल्या परसबागेत विविध पारंपरिक वाणांचा वापर करून सुंदर अशी हंगामी परसबाग फुलवली आहे. दोडका , घोसाळी , लाल भोपळा, दुधी भोपळा, कारली ,भेंडी, काकडी ,खरबूज , मिरची तसेच इतरही अनेक रानभाज्या त्यांनी आपल्या परसबागेत फुलवल्या आहेत. अत्यंत मेहनती आणि निसर्गाशी एकरूप होऊन कार्य करणाऱ्या ममताबाई भांगरे यांनी तयार केलेला दुधीभोपळ्यांचा मंडप तालुक्यासह राज्य व देश पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे. नुकत्याच त्यांच्या परसबागेला देश आणि विदेशातील कृषी शास्त्रज्ञांनी भेट दिली आहे.

त्यांनी विकसित केलेले सेंद्रिय शेतीतील तंत्रज्ञान जसे की गांडूळ खतापासून तयार केलेल्या गोळ्या व गांडूळ खतांचा वापर करून तयार केलेले व्हर्मी सीडबॉल हे जागतिक पटलावर मांडले गेले आहे. कलकत्ता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सायन्स परिषदेसाठी त्यांना निमंत्रित केले गेले होते. या परिषदेत त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान सर्व शास्त्रज्ञ मंडळींनी मान्य केले होते. निसर्ग नियमांचे पालन करून अपेक्षित उत्पन्न घेता येते व रासायनिक शेतीपासून मुक्त होता येते हेच त्यांच्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. कृषी संशोधन केंद्र , कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ तसेच कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या नामांकित संस्था ममताबाई भांगरे यांचे मार्गदर्शन घेत असतात. सध्या तरी तालुक्यात ममताबाई यांनी वाढवलेल्या दुधी भोपळ्यांचा जोरदार विषय रंगला आहे
