साईसेवा मतिमंद विद्यालयात दिव्यांग दिन उत्साहात साजरा

शिर्डी प्रतिनिधी
( संजय महाजन )
आज दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री देविदास कोकाटे साहेब व आधार शिक्षण व ग्रामीण विकास मंडळ संस्थेचे सचिव मा.श्री सुनील शिवनाथ कवडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली साईसेवा निवासी मतिमंद विद्यालय शिर्डी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग जनजागृतीसाठी शिर्डी परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष श्री कैलास बापू कोते यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले याप्रसंगी शिर्डीतील दिव्यांग प्रहार संघटनेचे अध्यक्ष श्री कैलासभाऊ यादगुडे, दिव्यांग बांधव व शिर्डी बसस्थानक आगार व्यवस्थापक श्री बनकर साहेब हजर होते. प्रभात फेरी झाल्यानंतर पेडियट्रिक फिजिओथेरपी डॉ.ए पी जे अब्दुल कलाम COPT प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स तर्फे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळ स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या.
या सर्व स्पर्धांमध्ये क्रमांक प्राप्त व सहभागी विद्यार्थ्यांना शिर्डीचे उपविभागीय अधिकारी श्री शिरीष वमणे साहेब यांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी श्री वमने साहेब म्हणाले की “शक्यतो मी माझ्या कामकाजामुळे या कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही, परंतु आज मी आवर्जून उपस्थित राहिलो येथील कामकाज पाहिले मला खूप आनंद झाला व या विद्यार्थ्यांची कुठलीही अडचण सोडवण्यासाठी मी सदैव कार्यरत राहील.” वमने साहेबांचा सत्कार विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते साईबाबा शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे विशेष शिक्षक श्री नासीर देशमुख सर यांनी केले तसेच मानसोपचार तज्ञ श्रीमती हेमलता पवार मॅडम यांनी विद्यालयाविषयी माहिती सांगितली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.