अनेकांचे प्राण वाचवणारा कोरोनायोद्धा हरपला!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात असलेल्या ब्राम्हणी गावातील प्रख्यात डॉक्टर राहुल ज्ञानदेव मोकाटे यांचे दि.२१/१०/२०२३ रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने संपूर्ण ब्राह्मणी गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
डॉ.राहुल मोकाटे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. कोणीही रूग्ण रात्री अपरात्री कधी आले किंवा फोन केला तर एका फोनवर धावून येत त्यांनी त्या रूग्णांवर वेळेवर उपचार करत अनेकांचे प्राण वाचवले. कोरोना काळात सर्वत्र भयभीत वातावरण तयार झाले होते. कोणीही घराबाहेर निघण्यास तयार नव्हते. परंतु आपण समाजाचे देणे लागतो हा ध्यास मनी बाळगून डॉ.मोकाटे यांनी कोरोना काळात उत्तम कामगिरी केली
रूग्ण हिच ईश्वर सेवा मानून अविरतपणे सुरू ठेवली. त्यांनी ज्ञानी क्लिनिक च्या माध्यमातून तब्बल १८ वर्षे रुग्णसेवा केली. डॉ मोकाटे यांच्यावर अहमदनगर येथील साईदीप रूग्णालयात उपचार सुरू होते परंतु दि.२१/१०/२०२३ रोजी रात्री त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली व अनेकांना जीवनदान देणाऱ्या या अवलियावर काळाने घाला घातला व रात्री साडे नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
आपल्या लाडक्या डॉक्टरला अखेरचा निरोप देण्यासाठी आप्तेष्ट, मित्र परिवार यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय जमा झाला होता. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. तसेच त्यांच्या मृत्यूची बातमी पसरताच अनेकांची मने सुन्न झाली होती.
डॉ.मोकाटे वैद्यकीय क्षेत्रासोबतच राजकीय व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी कर्तुत्वाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ब्राम्हणी येथील प्रगतिशील शेतकरी ॲड. ज्ञानदेव रामभाऊ मोकाटे यांचे जेष्ठ चिरंजीव तर आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य राजेश मोकाटे यांचे ते मोठे बंधू होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दहा वर्षाचा मुलगा, भाऊ, भाऊजाई, बहिण, पुतणी असा मोठा परिवार आहे.