राजूरच्या दारुबंदी विषयी उमेदवारांनी भूमिका स्पष्ट करावी-मागणी

दारुबंदी आंदोलनाची मागणी
अकोले प्रतिनिधी
राजूरमधील जनतेने लढा उभारून दारुबंदी घडवली पण राजूरमध्ये खुलेआम दारू विकली जात आहे. तेव्हा आता ग्रामपंचायत उमेदवारांनी राजूरच्या दारू थांबवण्याबाबत प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्रावर आपली भूमिका जाहीर करावी व जनतेने अशा उमेदवारांनाच मतदान करावे असे आवाहन अकोले तालुका दारुबंदी आंदोलनाचे कार्यकर्ते हेरंबकुलकर्णी,निलेश तळेकर, संतोष मुतडक,गौराम बिडवे यांनी केले आहे..
राजूरमध्ये प्यायला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो पण दारुबंदी असून दारू मात्र सहज उपलब्ध आहे. आजी व माजी आमदार राजूरचे असूनही राजूरच्या दारूविक्रीत काहीही फरक पडला नाही. तेव्हा वैभव पिचड व आमदार डॉ किरण लहामटे या दोघांनीही आपल्याकडे सत्ता आली तर दारू बंद होण्यासाठी काय करणार ? हे राजूरच्या जनतेला सांगावे कारण अनेक तरुण या दारूने मृत्यू झाले आहेत..
प्रत्येक उमेदवाराने केवळ दारू बंद करू असे न सांगता प्रतिज्ञापत्रावर दारू बंद करू असे अभिवचन द्यावे व मतदारांनी फक्त अशा उमेदवारांना च मतदान करावे. मते मागायला आलेल्या उमेदवारांना व त्यांच्या नेत्यांना महिलांनी गेली १७ वर्षे दारूने इतका उच्छाद मांडूनही तुम्ही काय केले हा जाब विचारावा असे आवाहन दारुबंदी आंदोलनाने केले आहे