राज्य उत्पादन शुल्क विभागाची नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यात धडक कारवाई , २७ गुन्हे दाखल!

नेवासा: विधानसभा २०२४ आदर्श आचार संहिता अनुषंगाने विशेष मोहीम राबवुन अवैध रित्या दारू विक्री करणारे ढाबे व वाहतुकीवर नेवासा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई करून नेवासा, शेवगाव व पाथर्डी या तीन तालुक्यात २७ गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती दारू उत्पादन निरीक्षक एस. ए जाधव यांनी दिली.
विधानसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहितेच्या अनुषंगाने नेवासा निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी दि. १५ आँक्टोबर ते १० नोव्हेंबर अखेर विशेष मोहीम राबवुन कार्यक्षेत्रातील नेवासा, शेवगाव व पाथर्डी या तालुक्यात अवैध रित्या दारू विक्री करणारे ढाबे व वाहतुकीवर धडक कारवाई करत एकूण २७ गुन्हे नोंद करून देशी, विदेशी मद्य, हातभट्टी असा सुमारे ५ लाख
१२ हजार ५८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अंतर्गत ५ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. याबरोबरच दोन परमिट रूम चालकांनी नियमभंग केल्याप्रकरणी वरिष्ठांकडे कारवाई करिता प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.
सदरची कारवाई जिल्हा अधिक्षक प्रमोद सोनोने उपअधीक्षक प्रविणकुमार तेली, यांच्या मार्गदर्शनाखाली
कारवाईत निरीक्षक एस. ए जाधव, दुय्यम निरीक्षक पी एस पाटील, दुय्यम निरीक्षक आर. ए. घोरपडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जे एच क्षीरसागर, महिला जवान एस एस राठोड, जवान वाहन चालक एस व्ही बिटके, जवान एन आर ठोकळ तसेच महिला जवान व्ही एस जाधव व जवान व्ही एच मेहेत्रे हे सहभागी झाले होते.