बायफ संस्थेचे अध्यक्ष डॉ .भरत काकडे यांची रमाकांत डेरे यांच्या प्रदर्शन दालनाला भेट….

विलास तुपे
राजूर/प्रतिनिधी
बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भरत काकडे यांनी नुकतीच ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ श्री. रमाकांत डेरे यांच्या राजूर येथील गारगोटी संग्रहालय तसेच जुन्या काळातील नाणी व पोस्टाची तिकिटे तसेच निसर्गातील विविध आकार असलेल्या लाकडांच्या प्रदर्शन दालनाला भेट दिली.
दगडांचा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तसेच चंदन लागवडीला राजश्रय मिळवून देणारे ज्येष्ठ शेती तज्ञ रमाकांत डेरे गेली पाच ते सहा दशके विविध क्षेत्रात आपली सेवा देत आहेत. शेतकऱ्यांचे व आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेले रमाकांत डेरे यांच्याकडे विविध क्षेत्रातील मान्यवर भेटी देत असतात.
सावरकुटे या आदिवासीबहुल गावातील फळबाग लागवडीचा प्रयोग देशभर गाजलेला आहे. नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य वापर करून जीवनमान उंचावण्यासाठी फळबाग लागवडीतून स्थायी रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी उभे केलेले मॉडेल सर्वश्रुत आहे. चंदन शेतीच्या माध्यमाने हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पर्यावरण पूरक शेतीचा मार्ग त्यांनी दाखवला आहे. चंदनाला शेती प्रकारामध्ये समाविष्ट करण्यासाठी शासन दरबारी त्यांनी केलेला सत्याग्रह सर्वांना माहीत आहे. खाजगी मालकीच्या जमिनीत चंदन लागवड करून त्याची नोंद सातबारावर घेता येते हे केवळ रमाकांत डेरे यांच्या प्रयत्नातून शक्य झाले.

रमाकांत डेरे यांचे जगभर मित्र परिवार विस्तारलेला आहे. या मित्रांच्या माध्यमातून जमा केलेले विविध देशातील पोस्टाची तिकिटे, चलनात असलेली व नसलेली विविध आकाराची नाणी , निसर्गात सापडलेले विविध आकारांचे दगड व गारगोटी, जंगलातील लाकडांचे विविध प्रकार व आकार , सागापासून बनवलेले भव्य दिव्य फर्निचर , जुन्या काळातील पुस्तके व नियतकालिके यांचा मोठा संग्रह त्यांच्या राजूर येथील दालनात बघायला भेटतो .
बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून डेरे यांचा सर्वांना परिचय आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत डॉक्टर भरत काकडे यांनी त्यांची राजुर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे विविध प्रयोग समजावून घेतले. समाजाप्रती असलेले त्यांचे विचार व कार्य सुमारे दोन तास वेळ देऊन जवळून बघितले. संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये डेरे यांनी केलेले विविध प्रयोग सामावून घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पुन्हा एकदा प्रत्यक्ष शेतावर केलेले प्रयोग बघण्यासाठी येण्याचे आश्वासन देऊन त्यांनी राजुरकरांचा व डेरे यांच्यासह त्यांच्या परिवाराचा निरोप घेतला.