विद्या प्रसारिणी सभेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी :
(संजय महाजन )
3 डिसेंबर सभेच्या स्थापना दिवस या निमित्तानेच पुणे येथील भारत इंग्लिश स्कूल शिवाजीनगर याठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.वा.मा. औटी होते. शिक्षण संचालक तथा म.रा. माध्य. उच्च माध्य. शिक्षण मंडळ पुणे अध्यक्ष मा.श्री.शरद गोसावी उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती करून झाली. ईशस्तवन प्रशालेच्या संस्था पर्यवेक्षिका श्रीमती पूजा भुरके यांनी अतिशय मंजूळ स्वरात सादर केले. स्वागतगीत प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती सुनीता ढिले, संस्था पर्यवेक्षिका श्रीमती पूजा भुरके आणि श्रीमती वर्षा कुलकर्णी यांनी प्रसन्न वातावरणात सादर केले.
विद्या प्रसारिणी सभेचे कार्यवाह मा.डॉ. सतीश गवळी यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय आपल्या उत्कृष्ट भाषाशैलीतून उपस्थितांना करून दिला. मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर विद्या प्रसारिणी सभेच्या वतीने आदर्श शिक्षक आणि प्रकल्प विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यानंतर मागील शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक-शिक्षकेत्तरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल श्रीमती सुनीता सपाटे, श्रीमती शिल्पा आचरेकर आणि श्री. बाळासाहेब खेडकर यांनी मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. औटी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून नाविन्यपूर्ण प्रकल्प कसे असावेत याबाबत मार्गदर्शन केले.
विद्या प्रसारिणी सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष मा. डॉ. मृणालिनी गरवारे यांनी आपल्या मनोगातून संस्थेचा गौरवशाली वारसा पुढे असाच सुरू राहील याची ग्वाही देऊन संस्थेच्या यशोदायी वाटचालीत शिक्षक-शिक्षकेत्तर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे याचा आवर्जून उल्लेख केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. शरद गोसावी साहेब यांनी आपल्या मनोगतातून आदर्श शिक्षक कसा असावा याबाबत आपले विचार स्पष्ट केले. त्याचबरोबर शिक्षण ही अखंडित चालणारी प्रक्रिया आहे त्यासाठी शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरतपणे सुरू ठेवावे असे आवाहन केले.
कार्यक्रमानिमित्त नियामक मंडळ सदस्य डॉ. हिरेन निरगुडकर, श्री. अरविंदभाई मेहता, श्री. कन्हैया भुरट, श्री. दिलीप सराफ, अॅड. संदीप अगरवाल, श्री. प्रमोद कुदळे. श्री. केशव कुलकर्णी, श्री. भगवानभाऊ आंबेकर (शाळा समिती अध्यक्ष व्ही.पी.एस लोणावळा) तसेच विविध विद्याशाखेंमधील प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. आदिनाथ दहिफळे (उपप्राचार्य), श्री. रवी दंडगव्हाळ (वरिष्ठ लिपिक), श्री. बाळासाहेब खेडकर, श्री. अमित रसाळ, श्रीमती सुनिता वरे, श्री. विकास आढाव (सेवक), श्री. सचिन लोंढे (सेवक) यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले
शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा हवालदार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुनिता सपाटे आणि श्रीमती नेहा जोशी यांनी केले. कार्यक्रमाची सुरेल सांगता भारत इंग्लिश स्कूलच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती सुनिता ढिले यांनी पसायदानाने केली.
भारत इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात विद्या प्रसारिणी सभेचा १०१ वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला.