एप्रिल , मे , महिन्यात विक्री केलेल्या कांदयालाही अनुदान मिळावे ! सभापती बाबासाहेब तरटे

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाने 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत विक्री केलेल्या कांदयाला 350/- रुपये प्रती क्विंटल प्रमाणे कांदा अनुदान जाहीर केलेले आहे. परंतु गेल्या खरीप हंगामापासुन शेतकऱ्यांना कांदा पिकाला बाजार भाव नसल्यामुळे उत्पादन खर्च ही निघणे अवघड होवुन शेतकरी पुर्णपणे कर्ज बाजारी झालेला आहे.शासनाने फेब्रुवारी व मार्च महिन्याचे कांदा अनुदान जाहीर केलेले आहे.परंतु त्यासाठी ई–पीक पहाणी, त्रिसदस्यीय समितीचा अहवाल, अशा अनेक जाचक अटी दिलेल्या असल्याने अनेक शेतकरी सदर अनुदानापासुन वंचीत राहणार आहे.
तरी सदर अटी शिथिल करण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केलेली असुन त्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा असे सभापती यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे एप्रिल व मे 2023 मध्ये राज्यामध्ये अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपीट झालेली आहे. सदर हंगाम हा उन्हाळी व रब्बी कांदा काढणीचा असल्याने अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे कांदा पीकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असुन काढलेला कांदा खराब होत असल्याने विक्री विना पडुन आहे तसेच बाजार समित्यांमध्ये ही फेब्रुवारी व मार्च महिन्यांपेक्षाही अतिशय कमी दर एप्रिल व मे महिन्यांत मिळालेला आहे.सध्या बाजार समित्यांमध्ये कांदयाला 3 ते 8 रुपया पर्यंत दर मिळत आहेत.त्यामुळे अगोदरच अवकाळी व गारपीटीने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला असतांना कांदयाला बाजार भाव नसल्यामुळे कर्ज बाजार झालेला आहे.
त्यामुळे कांदा उत्पादकांना माहे एप्रिल व मे 2023 या कालावधी मध्ये विक्री केलेल्या कांदयाला पण अनुदान देण्यात यावे अशी आग्रही मागणी सभापती बाबासाहेब तरटे यांनी केली आहे.तसेच कांदा अनुदानाबाबत असलेल्या जाचक अटी रद्द करण्यात येवुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी उपसभापती भाऊसाहेब शिर्के व संचालक मंडळाने केली आहे.